अबब…! महिलेने विहिरीतून काढली घोणस अन…
अबब…! महिलेने विहिरीतून काढली घोणस अन…
महाबुलेटीन न्यूज । अतुल सवाखंडे
चाकण : कालचा शनिवार…दुपारची रखरखत्या उन्हाची वेळ… खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील शेतकरी सुभाष भोंडवे यांनी त्यांच्या विहिरीत अजगर असल्याचे पत्रकार हनुमंत देवकर यांना सांगितले…देवकर यांनी त्वरित बापूसाहेब सोनवणे, अतुल सवाखंडे, बापू शेवकरी या सर्पमित्रांना रेस्क्यूसाठी कॉल केले…सापाचे सांगितलेल्या वर्णनावरून तो विषारी घोणस असल्याचे त्यांनी सांगितले…सर्व सर्पमित्र बाहेर असल्याने भोंडवे यांचा मोबाईल नंबर त्यांना दिला व भोंडवे यांना घोणसवर लक्ष ठेवण्यास सांगितले…सर्पमित्रांनी शेतकऱ्याचा मोबाईल नंबर रेस्क्यू टीमच्या ग्रुपवर शेअर केला…अन हा घोणस पकडण्याचे आवाहन साप, प्राणी व पक्षी यांचे रेस्क्यूचे मागील दहा ते बारा वर्षांपासून काम करणाऱ्या प्रिया गायकवाड या महिलेने स्विकारले. त्यांनी आपली मैत्रीण नूतन बोऱ्हाडे यांना सोबत घेऊन तडक वाकी येथील शेतकऱ्याची विहीर गाठली. आणि जागेची पाहणी करून अतिशय अवघड परिस्थितीत शक्य नसतानाही प्रिया गायकवाड यांनी टेक्निक वापरून अतिशय शिताफीने विहिरीतून घोणस बाहेर काढला…आणि शेतकऱ्याने एकदाचा सुस्कारा सोडला…अतिशय अवघड परिस्थितीत खडतर प्रयत्न करून साप बाहेर काढल्यानंतर रेस्क्यू पूर्ण झाल्यावर या महिला व शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता…ही कामगिरी फत्ते होताच या महिलांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
. ● विहिरीतून घोणस काढणाऱ्या प्रिया गायकवाड यांचा अनुभव प्रत्यक्ष त्यांचाच शब्दात…
मी प्रिया गायकवाड,
गेली दहा-बारा वर्षांपासून साप, प्राणी व पक्षी रेस्क्यु करण्याचे काम करत आहे. आज आमच्या खेड व चाकण रेस्क्यू टीमच्या ग्रूपवर मेसेज आला की वाकी बुदुक येथे विहिरी मध्ये घोणस जातीचा विषारी साप पडला आहे, कोणी जाता का? तेव्हा मी जाते, असे सांगून मी व माझी मैत्रीण नूतन बोऱ्हाडे आम्ही तिथे पोहचलो आणि तेथील परिस्तिथी पहिली तेव्हा पूर्ण विहीर झाडं, वेलीनी झाकलेली होती. थोड अवघड वाटत होतं; पण थोडं टेक्निक वापरून साधारण चार फूट लांबीची घोणस विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात मी यशस्वी झाले. विहीर मालकांना ही खूप बरं वाटलं की साप बाहेर काढता आला. हे ऐकुन जास्त छान वाटलं, कारण समाजात पण सापांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलायला लागला आहे.
“साप हा निसर्गाचाच अन्नसाखळीतील एक प्रमुख भाग आहे. साप वाचवा निसर्गाचे संवर्धन करा.”