चार महिन्याच्या मुलास मारुन टाकणा-या जन्मदात्या बापास अटक
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन स्वतःच्या ४ महिने २३ दिवसाच्या मुलास विहिरीत बुडवून मारणा-या नराधम बापास इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे. त्याला हे कृत्य करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन त्याची आई व भावजयीविरुध्द ही इंदापूर पोलीसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.
मनोज दत्तु शिंदे, कांताबाई दत्तु शिंदे, पिवु बाबु शिंदे ( सर्व रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर ) अशी आरोपींची नावे आहेत. तर ध्रुव मनोज शिंदे असे मरण पावलेल्या त्या दुर्देवी चिमुकल्याचे नाव आहे. आरोपी मनोजचा मेव्हणा दीपक मच्छिंद्र तांबवे ( रा. अण्णाभाऊ साठेनगर, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर ) याने या संदर्भात फिर्याद दिली आहे.
या संदर्भात माहिती देताना सहा. पो. निरीक्षक व तपास अधिकारी बिराप्पा लातूरे यांनी सांगितले की, फिर्यादी तांबवे याच्या बहिणीचा विवाह आरोपी मनोज बरोबर झाला आहे. बहिणीची जाऊ पिवू शिंदे हिचे आरोपीच्या पत्नीबरोबर वाद होत असत. त्यामुळे तिला अद्दल घडवण्यासाठी तिचे पर पुरुषाशी संबंध असल्याचे पिवूने आरोपीच्या मनात भरवले. तिच्या पोटातील बाळ त्याचे नसल्याचे सांगितले. आरोपीची आई कांताबाई शिंदे हिने जन्माला आलेले बाळ आरोपी मनोजसारखे दिसत नसल्याचे आरोपीस सांगून त्या बाळास जीवे ठार मारण्यासाठी प्रवृत्त केले.
परिणामी, आरोपी मनोज शिंदे याने गेल्या शुक्रवारी ( दि.३१ जुलै ) सकाळी साडेसहा ते सव्वासात वाजण्याच्या दरम्यान आपली पत्नी पुजा दुध आणण्यासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधून आपला मुलगा ध्रुव यास रघुनाथ अनंता ठवरे यांच्या मालकीच्या विहीरीत टाकून दिले. पुजा दुध घेवून आल्यानंतर ध्रुव दिसला नाही. तिने आरोपीस विचारले. त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.
त्यानंतर ध्रुवचा शोध चालू असताना राजु हनुमंत शिंदे.( रा. वरकुटे खुर्द, ठवरे वस्ती ) याने ध्रुव हा रघुनाथ ठवरे यांच्या विहीरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे घरी येवुन सांगितले. ध्रुवला पाण्यातुन बाहेर काढुन उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णांलयात दाखल केले असता तो मरण पावल्याचे तेथील डाॅक्टरांनी सांगितले. याची माहिती पूजाने फिर्यादीस सांगितली. त्याने त्याचदिवशी फिर्याद दिली. त्यानंतर काही तासातच पोलीसांनी आरोपीस पकडले. उर्वरित दोघी मुंबईमध्ये असून त्यांना देखील लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे लातूरे यांनी सांगितले. आरोपीस दि.१ ऑगस्ट रोजी इंदापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यास न्यायालयाने सात दिवसाची कोठडी सुनावली आहे.
” पुराणकाळातील ध्रुवाला त्याच्या पित्याने केवळ मांडीवर बसवले नव्हते या कारणासाठी त्या ध्रुवाने तपश्चर्या करुन देवाकडून अढळस्थान मिळवले होते. या प्रकरणातील ध्रुव त्याच्यापेक्षा कित्येक पटीने दुर्देवी निघाला.जावा-जावात होणा-या भांडणातून एकीने दुसरीला अद्दल घडवण्यासाठी तिच्या नव-याच्या मनात संशयाचा सैतान उभा केला. जी आजी मायेची मुर्ती समजली जाते, ती ही जीवावर उठली. अन् वडीलांनी तर थेट देवाघरी पाठवले.”