२२ दिवसात १२ गावठी कट्टे हस्तगत, एल.सी.बी.ने केली कारवाई
भुसावळ येथे गावठी कट्टे सापडण्याचा सिलसिला सुरूच
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
भुसावळ : येथील यावल रोडवरील नाक्याजवळ वनविभागाच्या कार्यालयासमोर संशयित आरोपी सागर बापूराव सपकाळे ( रा. अंजाळे, ता. यावल ) यास गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३८२/२०, आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी सपकाळे हा यावल रोडवरील गांधी पुतळ्यासमोर यावल नाक्याजवळील वनविभागाच्या कार्यालयाजवळ उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. हे पोलीस पथक ९ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील गुन्ह्याच्या तपासासाठी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आले होते. मात्र त्यांना माहिती मिळताच पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, पो. हे. कॉ. कमलाकर बागुल, चालक पो. ना. दादाराव पाटील, पो. ना. प्रवीण हिवराळे यांनी घटनास्थळी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व अडीच हजार रुपये किमतीचे जिवंत काडतुसे मिळाली.
या गावठी कट्ट्यावर मेड इन यू. एस. इ. ३२ एम. एम. असे लिहिले आहे. आरोपीस शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस स्टेशनला आतापर्यंत २२ दिवसात १२ गावठी कट्टे सापडल्याची नोंद करण्यात आली आहे.