झाडांना राख्या बांधून विद्यार्थ्यांनी साजरे केले रक्षाबंधन
महाबुलेटीन न्यूज / शैलेश काटे
इंदापूर : बालवयातच वृक्ष व वृक्षसंवर्धनाचे महत्व समजावे यासाठी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची शपथ देवून त्यांच्याकडून झाडांनाच राख्या बांधून घेण्याचा आगळा वेगळा उपक्रम येथील श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिराच्या वतीने राबवण्यात आला.
विद्यामंदिरातील शिक्षिका संतोषी वखरे यांनी चिंचेची शंभर रोपे तयार केली होती. हर्षदा रविंद्र कदम, सूर्यम बाबासाहेब सस्तारे, मधुरा बनकर, अक्षरा बनकर या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी करंज, सिताफळ आदी झाडांच्या बिया जमवल्या होत्या.
मुलांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावे यासाठी मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड, शिक्षिका संतोषी वखरे, अतुल साळुंखे व पालक बाबासाहेब सस्तारे यांनी विद्यार्थ्यांना शहा नर्सरीत नेले. तेथे शहा नर्सरीचे प्रमुख मुकुंद शहा व नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी तेेेेथील वृक्षांना राख्या बांधल्या. वखरे यांनी तयार केलेली रोपे व विद्यार्थ्यांनी जमवलेल्या बिया शहा नर्सरीकडे सुपूर्द करण्यात आल्या.