यशोगाथा शेलपिंपळगावच्या दूध उत्पादक शेतकऱ्याची…
यशोगाथा शेलपिंपळगावच्या दूध उत्पादक शेतकऱ्याची…
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क :
कष्ट करण्याची वृत्ती, सुयोग्य नियोजन आणि कुटुंबाची त्याला लाभलेली साथ या तीन गोष्टी एकत्र आल्या की, कुठलाही व्यवसाय यशस्वी होतो, हे शेलपिंपळगावचे दूध उत्पादक श्री ज्ञानेश्वर कराळे यांनी दाखवून दिले आहे. उत्पादन खर्चात केलेली बचत, दुधाचा उत्तम दर्जा या गोष्टींमुळे व्यवसाय विस्तार करणे शक्य झाले आहे. आज हाच दुग्धव्यवसाय कुटुंबाचा आर्थिक कणा ठरला आहे.
श्री ज्ञानेश्वर कराळे यांनी २००९ साली भोसरी येथे दूध डेअरी सुरू केली. त्यासाठी सुरुवातीला इतर दूध विक्रेत्यांकडून दूध संकलन करून त्याची विक्री ते करत होते. परंतु दूध उत्पादनात पुर्णता स्वावलंबी व्हावे, या विचाराने २०१७ साली त्यांनी बारा म्हशींची खरेदी केली. आजमितीला त्यांच्याकडे जातीवंत वाणाच्या ५२ म्हशी आणि ४ गाई आहेत. म्हशींचे व्यवस्थापन तंत्रशुद्ध पद्धतीने केले जात असल्यामुळे दिवसाला ४०० ते ४५० लिटर दुधाचे उत्पादन त्यांना होत आहे. या दुधापासून दही, चक्का, श्रीखंड इत्यादी दुग्ध पदार्थ तयार केले जातात. ‘ सर्व पदार्थ घरची माणसे तयार करत असल्यामुळे बाहेरील व्यक्तीचा कुठलाही हस्तक्षेप होत नाही, यामुळे पदार्थाची गुणवत्ता उत्तम राहून त्यांना भोसरी व पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात मागणी आहे, ‘ असे ज्ञानेश्वर कराळे यांनी सांगितले. त्यांच्या यशोगाथेचे माहिती संकलन कृषी महाविद्यालय पुणेची विद्यार्थिनी कु. श्रुतिका संदीप नाणेकर हिने केले आहे. यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. डी. सूर्यवंशी व चेअरमन डॉ. एस. एन. हसबनीस यांनी मार्गदर्शन केले आहे.