Thursday, August 28, 2025
Latest:
कोरोनाखेडपुणे जिल्हाप्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

विकेंड संचारबंदीने आळंदी पंचक्रोशीत शुकशुकाट

विकेंड संचारबंदीने आळंदी पंचक्रोशीत शुकशुकाट

महाबुलेटीन न्यूज 
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कोरोना या महामारीचे सावट वाढत असल्याने रुग्ण साखळी तोडण्यासाठीचे उपाय योजने अंतर्गत महामारी पासून नागरिक सुरक्षित राहण्यासाठी विकेंड संचारबंदीचे काळात व्यापारी, नागरीकांनी प्रशासनाचे आवाहनास प्रतिसाद दिला.

तिर्थक्षेत्र आळंदीसह परीसरातील गावांत बंदला सर्व आस्थापना मालकांनी आपआपली दुकाने बंद ठेऊन पहिल्या दिवशी साथ दिली. आळंदी मंदीरासह सर्व धार्मिक स्थळे बंद होती. रस्त्यांवरील वर्दळही बंद राहिल्याने रस्ते निर्मनुष्य दिसले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. केवळ दुध विक्री सकाळी अकरा पर्यत सुरु होती. अकरा नंतर मात्र वर्दळ दिसली नाही.

यावर्षीचा पहिला विकेंड लाॅकडाऊन अटी शर्तीसह बंधनकारक असल्याने पोलिस, महसूल व आळंदी नगरपरिषद, आळंदी प्रशासनाने काळजी घेत नागरीक व्यापारी यांना बंद साठी आवाहन केले. आरोग्य सेवा नियमित सुरु राहीली. लस डोस देण्यात आली. घरभेटीतुन लसीकरण नांवनोंदणी आळंदीत सुरु होती. पाणी पुरवठा व अत्यावश्यक सेवा वगळता आळंदीत प्रभावी पणे सोमवार सकाळ पर्यन्त संचारबंदी लागू झाल्याने आळंदी मंदिर परिसरात तसेच पंचक्रोशीत शुकशुकाट होता.

आळंदीत भाविकांची गर्दी होवू नये, म्हणून सुरू झालेल्या संचारबंदीची जनजागृती आळंदी नगरपरिषद व आळंदी पोलिसांनी शासनाचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे केल्याने आळंदीतील नागरिक, व्यापारी यांनी स्वत: पुढे येत आपआपल्या आस्थापना बंद ठेवल्याने आळंदी परिसरात या विकेंड संचारबंदीला नागरिकांतून प्रतिसाद मिळाला. स्थानिक नागरिकांनी देखील आरोग्यास प्राधान्य देत प्रशासनास साथ दिल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

आळंदी पोलीसांनी शहरात शासनाचे आदेशाने भाविक, नागरीकांना संचारबंदीतील सर्व नियम पाळण्याचे आवाहन करीत घरी रहा…सुरक्षित रहा…प्रशासनास सहकार्य करा…. विनाकारण बाहेर पडु नका. असा संदेश देत जनजागृती केली. आळंदी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ प्रशासनाचे सूचना प्रमाणे ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

यावेळी आळंदी शहरात सर्वत्र नागरिकांना आवाहन करण्यात आले. प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, चाकण चौक, घुंडरे आळी, भैरवनाथ चौक, वडगाव रस्ता आदी ठिकाणी जाहीर आवाहन करीत नागरिकांना नियम पाळीत घरी सुरक्षित राहण्यास आवाहन करण्यात आले.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!