Tuesday, October 14, 2025
Latest:
आदिवासीआंबेगावपुणे जिल्हाविशेष

महात्मा गांधी जयंती निमित्त २० पेक्षा अधिक गावात जनतेचा सत्याग्रह

७ ऑक्टोबर ला भीमाशंकर ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी यात्रा

महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे २० पेक्षा अधिक गावात २ ऑक्टोबर २०२० रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त जनतेचा शांततामय सत्याग्रह पार पडला. आंबेगाव तालुका किसान सभेच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सत्याग्रह आंदोलनात शेकडो श्रमिकांनी सहभाग घेतला होता.

या आंदोलनानंतर रोजगार हमी विषयक मागण्या मान्य होण्यासाठी बुधवार दि ७ ऑक्टोबर २०२० पासून भीमाशंकर ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय अशी सुमारे १६० किलोमीटरची पायी यात्रा सुरू होणार आहे. किसान सभेचे सुमारे २० कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ पायी चालत तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत जिल्हाधिकारी, पुणे यांची भेट घेणार आहे. जिल्हाधिकारी पुणे कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्याशी भेटून आपले म्हणणे हे शिष्टमंडळ सादर करणार आहे.

अनेक वेळा आंबेगाव तालुका तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे मागण्या मांडल्या पण काहीच प्रतिसाद नसल्याने महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त गावोगावी सुरू झालेले हे आंदोलन लोकांच्या हाताला गावातच काम कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी यांनी सांगितले.

किसान सभेच्या प्रमुख मागण्या :-
———————————-
१) जिल्हा परिषदेकडे ऐन लॉकडॉउन काळात कामाची मागणी करूनही काम उपलब्ध झालेले नाही अशा सर्व मजूरांना बेरोजगार भत्ता मिळावा.
२) किमान पाच मजूरप्रधान कामे आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या शेल्फवर ठेवावीत.
३) प्रत्येक कुटुंबाला कोणतेही शुल्क न घेता जॉबकार्ड त्वरित मिळावे.
४) जॉबकार्डचे नूतनीकरण त्वरित करून द्यावे.
५) आंबेगाव तालुक्यातील रोजगार हमीच्या कामांचे सोशल ऑडिट व्हावे.
६) आंबेगाव तालुक्यातील ज्या गावात रोजगार हमीवर काम करून दोन-दोन महिने अजून पगार मिळाला नाही त्यांना त्यांच्या कामांची मजुरी तात्काळ अदा करावी.
७) सुमारे १६ गावात रोजगार हमीच्या कामाची मागणी मजुरांनी करूनही काम दिले गेले नाही. मजुरांची फसवणूक केली गेली याबाबत दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!