वेळ आत्मपरिक्षणाची, राष्ट्रीय कार्याची….
वेळ आत्मपरिक्षणाची, राष्ट्रीय कार्याची….
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
‘मी कोरोनाला घाबरत नाही. कोरोना माझं काही बिघडवू शकत नाही.’ अशी शेखी मिरवायचे दिवस आता उरले नाहीत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची परिस्थिती बिकट असल्याचे आकडेवारी सांगते. ही आकडेवारी आणि उपलब्ध आरोग्य सुविधा पाहता प्रशासनाची आणि वैद्यकीय सुविधेची मर्यादा लक्षात येते. या पार्श्वभूमीवर ‘माझे कुटुंब’ माझी जबाबदारी’ हे तंतोतंत पाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. असे असतानाही काही महाभाग कोरोना माझं काही बिघडवू शकत नाही, अशा अविर्भावात वावरत आहेत. कोरोनाचा प्रसार करण्यास अशी प्रवृत्ती कारणीभूत ठरत आहे.
गतवर्षी 22 मार्चला देशात सर्वव्यापी लॉकडाउन लागला. सुरुवातीला हा लॉकडाऊन गांभीर्याने घेतला गेला. मार्चपासून सुरू झालेला हा लॉकडाऊन पुढे ऑगस्टपर्यंत व्यवस्थित पाळला गेला. त्यानंतर काहीशी शिथिलता आली. राजकीय कार्यक्रम, निवडणुका, लग्न समारंभ, हॉटेल्स, मॉल्स, जेवणावळी इत्यादी सर्रास सुरू झाले. तेथेच घात झाला, असे म्हणावे लागेल. येथूनच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. गतवर्षीपेक्षा कोरोना वेगाने पसरायला सुरुवात झाली. परिस्थिती आटोक्याबाहेर जायला लागली. महाराष्ट्र हा जगातील चौथ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट बनला. महाराष्ट्रात पुणे, नासिक, मुंबई ही शहरे आणि शहरांच्या परिसरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले. परिस्थिती जणू प्रशासनाच्या हाताबाहेर गेलेली आहे.
कोरोनाच्या टेस्ट अजूनही कमी होत असाव्यात, त्यामुळेच खरी आकडेवारी आणि प्रत्यक्षातील आकडेवारी यात अजूनही फरक असावा. कारण अनेकांना ‘सिम्प्टम्स’ दिसत नाहीत. कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या आणि प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा निश्चितच जास्त असू शकते. असे सर्व असताना आपण स्वतः किती काळजी घेतो, किती बेजबाबदार वागतो, असे प्रश्न उभे राहतात. अर्थात सर्वच गोष्टी प्रशासनावर ढकलून उपयोग नाही. खरेतर स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना महामारीत प्रशासनावर खापर फोडून उपयोग नाही. आरोग्य सुविधा बळकट हवी हेच कोरोना महामारीने अधोरेखीत केले आहे. रस्ते, पूल, इतर सुखसोयी महत्त्वाच्या असल्या तरी आरोग्य सुविधा या प्राधान्यक्रमाने असायला हव्यात, असे अंजन राजकीय व्यक्तींच्या डोळ्यात कोरोना महामारीने घातले.
एकाच चितेत अनेक जण, अंत्यविधीसाठी रांगा, हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसणे, ऑक्सिजन न मिळणे, व्हेंटिलेटर उपलब्ध नसणे, प्रतिबंधात्मक औषधांचा तुटवडा हे सारं काही लक्षात घेतलं, तर परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो. अशा गंभीर परिस्थितीत आपण आपली जबाबदारी पेलली पाहिजे. दुर्दैवी घटना आपल्या घरापर्यंत यायची आपण वाट पाहत आहोत का ? असा प्रश्न मोकाटपणे वावरत शासकीय नियम धाब्यावर बसवणाऱ्यांकडे पाहून वाटते. खरंतर कोरोना महामारीत ज्या कुटुंबांनी घरातली व्यक्ती गमावली, त्यांच्याकडून गांभीर्य समजून घ्यायला हवे. मात्र लक्षात कोण घेतो! खरे तर ही प्रवृत्ती निर्दयी अशीच म्हणावी लागेल.
सोशल मीडियावर उपदेशांचे डोस पाजणारी वाचणारी मंडळी, प्रत्यक्षात मात्र नियमांचे पालन करताना दिसत नाही. सरकार निर्णय घेईल. प्रशासन अंमलबजावणी करेन. मात्र राष्ट्रीय कार्य समजून आपण आपली जबाबदारी केव्हा पेलणार ? राष्ट्रापुढील संकट परतवायची ताकत प्रत्येक नागरिकात आहे. राष्ट्रीय कार्य समजून कोरोना विषयक नियमांचे पालन केले, तरी राष्ट्रीय कार्याला मोठा हातभार लागेल. ही वेळ आहे राष्ट्रीय कार्य करण्याची…! नियम पाळण्याची…! नियम पाळून देशाप्रती प्रेम व्यक्त करण्याची…!
“चला तर प्रशासनाला साथ देऊ, कोरोनाच्या संकटाला मात देऊ….”
——