महाबुलेटीन न्यूज : दत्ता घुले शिंदे-वासुली, दि.२५ : चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील गाव मौजे वासुली व सावरदरी येथील प्रतिष्ठित असलेल्या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणूक प्रक्रिया गावातील तरुण सहकाऱ्यांनी बिनविरोध करुन कोरोना काळात शांतता, सुव्यवस्था व सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे काम केल्याचे वासुलीचे पोलीस पाटील अमोल पाचपुते व सावरदरीचे पोलीस पाटील राहूल साकोरे यांनी सांगितले.
वासुली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडणुक स्थगित झाल्याने सुमारे एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर बुधवारी ( ता.२४) वासुली व सावरदरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. वासुलीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. सरपंच पदासाठी सौ. मीरा साहेबराव दहातोंडे व सौ. रत्ना सुरेश पिंगळे यांनी तर उपसरपंच पदासाठी विक्रम उत्तम पाचपुते यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. परंतु येथील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पोलीस पाटील अमोल पाचपुते व सहकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर रत्ना पिंगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून सरपंच, उपसरपंच पदासाठी एकेक अर्ज असल्याने सरपंचपदी मीरा दहातोंडे व उपसरपंच पदी विक्रम पाचपुते यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
वासुली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध होण्यासाठी पोलीस पाटील अमोल पाचपुते, माजी उपसरपंच विनोद पाचपुते, सोमनाथ पाचपुते,गोरख पाचपुते, रामदास जांभळे, अनिकेत पाचपुते व अन्य तरुण सहकाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले.
सावरदरी सरपंच व उपसरपंच सन्मान सोहळा…
सावरदरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी राखीव होते. सरपंच पदासाठी भरत शांताराम तरस व उपसरपंच पदासाठी संदिप बाळासाहेब पवार यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरपंचपदी भरत तरस तर उपसरपंचपदी संदिप पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
सावरदरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गोंधळजाई परिवर्तन पॅनलने ०-७ ने निवडणूक जिंकत २५ वर्षांचे सत्ता परिवर्तन केले होते. आज भरत तरस यांची सरपंचपदी तर संदिप पवार यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड होऊन सत्ता काबीज केली.
संपुर्ण निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सोमनाथ तरस, अंकुश कदम, हिरामण शेटे यांच्यासह उत्तम शेटे, कुंडलिक बुचूडे, विश्वास धोंडगे, बाळू बोत्रे, संतोष शिंदे, महादू बोत्रे, रविंद्र बुचूडे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. सावरदरी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
वासुलीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किशोर तारकसे व सहाय्यक म्हणून ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, तलाठी दत्तात्रय केंगले यांनी काम पाहिले. तर सावरदरीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. जे. मांदळे व ग्रामसेवक पी. ए. अत्तार यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.