Thursday, April 17, 2025
Latest:
खेडगुन्हेगारीपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

उमरग्यातील महिलेचा खराबवाडी येथे प्रेमसंबंधातून खून करून पळून गेलेल्या प्रियकरास पोलिसांनी २४ तासात ठोकल्या बेड्या, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी, कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीस केलेगजाआड

उमरग्यातील महिलेचा खराबवाडी येथे प्रेमसंबंधातून खून करून पळून गेलेल्या प्रियकरास पोलिसांनी २४ तासात ठोकल्या बेड्या,
पिंपरीचिंचवड गुन्हे शाखा युनिट ची कामगिरी, कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीस केलेगजाआड

महाबुलेटीन न्यूज

महाळुंगे इंगळे ( चाकण ) : महाळुंगे पोलीस चौकीच्या हददीतील खराबवाडी ( ता. खेड ) येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील महीलेचा प्रेमप्रकरणातून प्रियकराने चाकुने गळा कापुन दगडाने ठेचुन विद्रुप केलेल्या खुनाचे गुन्हयातील आरोपीस पिंपरीचिंचवड गुन्हे शाखा युनिट च्या पोलीस पथकाने कोणताही सुगावा नसताना अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून २४ तासाचे आत गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून दिनांक २०/११/२०२२ रोजी दुपारी .३० वा. चे पुर्वी प्रेम प्रकरणातून झाला असून निकीता संभाजी कांबळे ( वय २८ वर्षे, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे, मुळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राम कुंडलिक सुर्यवंशी ( वय ३९ वर्षे, रा. पवारवस्ती, साईबाबा मंदिर, दापोडी, पुणे ) यास पोलिसांनी पुण्यातील सिम्बायोसिस परिसरातून शिताफीने अटक केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, दिनांक २०/११/२०२२ रोजी दुपारी .३० वा. चे पुर्वी म्हाळुंगे चौकी हददीतील मौजे खराबवाडी ता. खेड जि. पुणे गावचे हददीत वाण्याचा मळ्याच्या पूर्वेकडील इसम नामे विनायक रेवजी खराबी यांचे मालकीची जमीन गट नंबर ३८६ मध्ये दक्षिण दिशेला असणारे भैरोबा ओढया लगतचे बांधावरील झुडपामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन वय वर्षे २२ ते २७ वर्षे वयोगटातील अनोळखी स्त्रीचा चाकुने गळा कापुन चेहयावर दगड टाकुन तिचा खुन केला आहे.

सदरबाबत म्हाळुंगे चौकी, चाकण पोलीस ठाणे येथे गु..नं. १७८२/२०२२ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. नमुद गुन्हयातील अनोळखी मयत महीलेचा चेहरा पुर्णपणे ठेचून विद्रुप केल्यामुळे सदर मयताची ओळख पटत नव्हती. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पिंपरीचिंचवड पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती स्वप्ना गोरे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गुन्हे शाखा युनिट यांचेकडील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना वेगवेगळया टिम तयारकरुन गुन्हा उघडकीस आण्ण्याकरीता मार्गदर्शन सुचना दिलेल्या होत्या.

मयताची ओळख पटवून गुन्हा उघड करणे बाबत चाकण, खराबवाडी परीसरात अधिक तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट ३ कडील पथकाने सदर परीसरातील ९० सीसीटीव्ही चेक केले तसेच सदर महीलेची ओळख पटविण्याकरीता सदर परीसरातील घरमालक, घरभाडेकरु, कंपनीतील कामगार, सुपरवाझर, स्थानिक नागरीकांकडे सखोल चौकशी करीत असताना पोलीस नाईक ऋषिकेश भोसुरे  पोलीस शिपाई राजकुमार हनमंते यांना त्यांचे खास गोपनिय बातमीदाराकडून माहीती मिळाली की, सदर मयत महीला ही खराबवाडी येथील हनुमान मंदिरामागील पाण्याच्या टाकीजवळील दिलीप गुलाब खराबी यांच्या १५ नंबरच्या खोलीत राहण्यास असून ती शनिवार रात्रीपासून मिळून आलेली नाही.

तेव्हा त्याबाबत तात्काळ वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड गुन्हे शाखा युनिट यांना माहीती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पोलीस पथकाने सदर महीलेच्या नातेवाईकांना संपर्क करुन महीलेचे नाव निकीता संभाजी कांबळे ( वय २८ वर्षे, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे, मुळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद ) असे असल्याबाबत समजले. तसेच सदर महीलेचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषात्मक तपास करुन घटनेच्या अगोदर सदर मयत महीलेस झालेले कॉलवरुन संशयीत इसम राम कुंडलिक सुर्यवंशी ( वय ३९ वर्षे, रा. पवारवस्ती, साईबाबा मंदिर, दापोडी, पुणे ) याचा पुणे येथील सिम्बॉयसेस परीसरातुन शोध घेवून त्यास शिताफिने ताब्यात घेतले.

त्याचेकडे तपास केला असता प्रथमतः त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून सदरची मयत व्यक्ती ही माझी जवळीची मैत्रिण असून तिला कोणी मारले? असा कांगावा करुन दुःख झाल्याचे भासवुन मोठमोठ्याने रडून तपास पथकाची पुर्णपणे दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. परंतु युनिट कडील तपास पथकाने संशयीत आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास केल्याने संशयीत आरोपी याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली.

त्याने माहीती दिली की, सदर मयत महीला निकीता कांबळे हीचे आरोपीचे पुर्वी एकत्र एल्प्रो मॉल चिंचवड मध्ये काम करीत असताना ओळख होवून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी निकीता कांबळे हीचे अजुन कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याबाबत आरोपी राम सुर्यवंशी यास संशय आला. तसेच राम सुर्यवंशी यांचे लग्न झाले असल्यामुळे त्याचे घरातील लोकांना सदर प्रेमसंबधाबाबत माहीती झाली होती. त्यामुळे राम सुर्यवंशी याची पत्नी त्याचे सोबत बोलत नव्हती. तसेच निकीता कांबळे देखील त्याचेशी बोलता दुर्लक्ष करीत होती. त्यामुळे रागाचे भरात निकीता कांबळे हीचा खुन केल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली.

अशाप्रकारे अनोळखी मयताची ओळख पटवून अज्ञात आरोपी बाबत काही एक सुगावा नसताना युनिट कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन माहीती काढण्यासाठी पारंपारीक पध्दतीचा कौशल्यपूर्ण वापर केला तसेच अचुक तांत्रिक विश्लेषण केले. परीणामी सदरचा क्लीष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर आरोपीस म्हाळुंगे चौकी, चाकण पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे,  अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती. स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, अंकुश लांडे, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, सुधिर दांगट, महेश भालचिम, विठठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे, रामदास मेरगळ, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी, राजेंद्र शेटे यांनी केली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!