तळेगाव शहरात प्लॅस्टिक व थर्मोकोलला पूर्णतः बंदी, वापरल्यास 5 हजार रुपये दंड : सभापती किशोर भेगडे ● तळेगाव शहर केले फ्लेक्स मुक्त, फ्लेक्सवर दंडात्मक कारवाई…
महाबुलेटीन न्यूज : मिलिंद अच्युत
तळेगाव दाभाडे : “प्लॅस्टिक व थर्मोकोलला तळेगाव शहरात पूर्णतः बंदी असून नगरपरिषद हद्दीत बंदी असतानाही जर कोणी वापर करताना आढळल्यास त्यास पाच हजार रुपयांचा स्वच्छता दंड भरावा लागणार,” असल्याचे नगरसेवक व स्वच्छता, वैद्यक व आरोग्य समिती सभापती किशोर भेगडे यांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्यावतीने नगरसेवक व स्वच्छता, वैद्यक व आरोग्य समिती सभापती किशोर भेगडे यांनी प्लस्टिकबंदी विषयी नियोजन करणेबाबत तळेगाव शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, इतर व्यावसायिक दुकानदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींशी विचार विनिमय करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद कौन्सिल हॉलमध्ये विशेष सभेचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन व वापर नियम 2006 व केंद्रीय पर्यावरण व वन विभाग, भारत सरकार यांचे प्लास्टिक वेस्ट 2011 अन्वये तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये प्लास्टिक पिशव्यांचे त्यामध्ये झबला, बॅग्स, ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या पातळ कॅरिबॅग्स, थर्मोकोल, स्ट्रॉ, प्लास्टिकचे चमचे त्या अनुषंगाने येणारी इतर प्लास्टिकजन्य वस्तूंचे उत्पादन, विक्री व वापर करण्यास बंदी घालण्यात आल्याचे किशोर भेगडे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.
किशोर भेगडे यांनी नुकताच स्वच्छता, वैद्यक व आरोग्य समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारला आहे. तळेगाव शहरात स्वच्छता दूत म्हणून किशोर भेगडे यांना ओळखले जाते. पदभार स्वीकारल्या नंतर दोनच दिवसात तळेगाव शहर फ्लेक्स मुक्त करण्याचे धाडस भेगडे यांनी दाखवले. तसेच अनेक फ्लेक्सवर दंडात्मक कारवाई त्यांनी केल्यामुळे धाडसी नगरसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2021” च्या अनुषंगाने शहर स्वच्छतेसाठी शहरातील सर्व हॉटेल चालक, दुकानदार व व्यापाऱ्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी जमा होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र दोन डस्टबिनची व्यवस्था करावी, असे भेगडे यांनी नमूद केले. तसेच तळेगाव शहरात दिवसातून दोनदा घंटा गाडी प्रत्येक वार्ड नुसार फिरणार असल्याने नागरिकांनी घंटा गाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तळेगाव शहरातील सर्व व्यापारी प्रतिनिधी, हॉटेल व्यावसायिक या विशेष सभेला उपस्थित होते. सर्व व्यापारी वर्गाने सभापती किशोर भेगडे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तळेगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सहयोग द्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. चित्राताई जगनाडे यांनी केले.
याप्रसंगी तळेगाव दाभाडे व्यापारी अससोसिएशनचे अध्यक्ष किरणशेठ ओसवाल यांनी आपल्या भाषणात प्लास्टिक बंदी निर्णयाचे स्वागत केले, तसेच सर्व व्यापारी वर्ग सभापती किशोर भेगडे यांच्या सूचनांचे पालन करणार असल्याचे नमूद केले.
या विशेष सभेला नगरसेवक अरुण भेगडे पाटील, नगरसेविका निताताई काळोखे, विभावरीताई दाभाडे, कल्पनाताई भोपळे, संध्याताई भेगडे, काजलताई गटे, किराणा व्यापारी संघ अध्यक्ष संजय मुनोत, भवरमल ओसवाल, सुभाष ओसवाल, प्रशांत ताये, निर्मल ओसवाल, संजय पाटवा, शिवाजी कारंडे, विजय चौधरी, विनोद ओसवाल, केतन ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
——————
तळेगाव शहरात संपूर्ण प्लास्टिक बंदी असून आढळल्यास ५००० रुपये दंड आकारण्यात येईल. कृपया स्वच्छ सुंदर तळेगावसाठी सर्वांनी सहकार्य करावे. उद्यापासून प्रत्यक्षात काम सुरू होत आहे.
— किशोर भेगडे
सभापती : स्वच्छता, वैद्यक व आरोग्य समिती
—————-
“किशोर भेगडे यांचे स्वच्छता दूत म्हणून कार्य सर्वोत्तम आहे, आम्ही सर्व व्यापारी प्लास्टिक बंदी निर्णयाचे स्वागत करतो. तसेच ओल्या व सुक्या कचऱ्याबाबत नियोजन करणार आहोत.”
— किरण ओसवाल
अध्यक्ष : तळेगाव दाभाडे व्यापारी असोसिएशन
—————