Saturday, August 30, 2025
Latest:
जुन्नरपुणे जिल्हाराजकीयविशेषसोशल मीडिया

“शिवाजीदादा, माझ्या बंधूने वापरलेल्या भाषेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो” : खासदार डॉ. अमोल कोल्हे

माजी खासदार आढळराव यांना अपशब्द वापरल्या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिकांची मागणी
महाबुलेटीन न्यूज 
नारायणगाव ( किरण वाजगे ) : शिरूर लोकसभा मतदार संघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील यांचे बाबत खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांचे बंधू सागर रामसिंग कोल्हे यांनी सोशल मीडियावर केलेल्या टीकेचे पडसाद शिरूर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात तीव्र स्वरूपात उमटले.

नारायणगाव पोलीस ठाण्यात जुन्नर शिवसेनेच्या वतीने माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हे बंधूंचा निषेध करण्यासाठी नारायणगाव पोलीस ठाण्यात आले होत. यावेळी शिवसैनिक आणि पदाधिकारी त्यांच्या समवेत होते. नारायणगांव पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी माजी आमदार शरद सोनवणे यांनी सागर कोल्हे यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी जुन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शाम पांडे, पुणे जिल्हा सल्लागार संभाजी तांबे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके, उपतालुका प्रमुख मंगेश काकडे, चंद्रकांत डोके, नारायणगाव ग्रामपंचयात माजी सरपंच रामदास बाळसराफ, माजी उपसरपंच संतोष वाजगे, आरिफ आतार, संतोष दांगट, नारायणगाव शहर शिवसेनेच्या वतीने सह्याद्री भिसे, युवा सेनेचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान या नंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी समाज माध्यमांतून दिलगिरी व्यक्त केली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आदरणीय,”शिवाजीदादा”, आपल्याबाबत माझ्या बंधूंकडून जी भाषा समाज माध्यमात वापरली गेली. त्याबद्दल मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो. तीन टर्म खासदार राहिलेल्या आपल्यासारख्या जेष्ठ व्यक्तीबाबत अशी भाषा वापरणं योग्य नाही, हे मी जाणतो. संबधित पोस्ट डिलीट करण्याची सूचना मी दिलेली आहे”. अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भावाने केलेल्या चुकीबद्दल समाज माध्यमातूनच दिलगिरी व्यक्त केली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे बंधू सागर रामसिंग कोल्हे यांनी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील यांच्याबद्दल समाज माध्यमातून शिवराळ भाषा वापरत समाज माध्यमांवर काही पोस्ट प्रसारित केल्या होत्या. संबंधित टीकाटिप्पणी करतांना कोणताही सुसंस्कृतपणा सागर यांनी दाखविला नाही, या उलट खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जेष्ठ लोकप्रतिनिधी बाबत टीका केली. आणि त्याचे प्रसारण समाज माध्यमांवर केले. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघात गुरुवारी आणि शुक्रवारी याचे तीव्र पडसाद उमटले. सागर कोल्हे यांचेवर कठोर कारवाईची मागणी शिवसैनिकांनी केली आणि या निंदनीय घटनेचा निषेध केला. शिवसैनिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार कोल्हे यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!