Wednesday, April 16, 2025
Latest:
जुन्नरपुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करू नये : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा

शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष : राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवजन्मस्थळी नतमस्तक,
पायी गडावर चढण करत केली शिवनेरीची पाहणी

महाबुलेटीन न्यूज : आनंद कांबळे
जुन्नर : शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते तर अवतारी पुरुष होते. त्यांच्या जन्मस्थळी भेट देण्याचे भाग्य मला मिळाले हा माझ्या पुण्याचा भाग आहे, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरीवर केले. शिवजन्मस्थळी नतमस्तक होण्यासाठी राज्यपाल आले होते. त्यांनी गडावरील शिवाई देवीची आरती केली. 

त्यावेळी “शिवाजी महाराज पैदल आये थे, तो हम भी पैदल आये“, असे म्हणत त्यांनी पायी येण्याचे महत्व विषद केले.
शिवनेरीवर येण्याअगोदर अनेकजण मला पाऊस आहे. चिखल आहे,असे सांगून घाबरवत होते. पण केवळ महाराजांविषयी श्रद्धेचे स्थान माझ्या मनात असल्याने मी येथे आलोय, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील, आमदार अतुल बेनके, वनविभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा, पुरातत्व विभागाचे उपअधिक्षक डॉ. राजेंद्र यादव आदींसह विविध खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करू नये : अनेक लोक शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी असल्याचे सांगतात, असे सांगताना त्यांनी घाबरु नये, मात्र शिवाजी महाराजांचे नाव घेऊन नुसता दिखावा देखील करु नये असे म्हणत, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकाऱण करणाऱ्यांना राज्यपालांनी अप्रत्यक्षपणे फटकारले.

ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते. येथे
आल्यानंतर त्यांच्या कर्तव्याची आठवण होते. आज राम, कृष्ण, गुरु गोविंदसिंग, शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला आले पाहिजेत, तरच दुनिया आपल्याकडे तिरक्या नजरेने
पाहणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपण उतारवयात देखील किल्ले शिवनेरी पायी चढून आलात, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील शिवनेरीवर पायी चालत यावे, असे तुम्हाला वाटते का असे विचारले असता, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी शिवाजी महाराजांप्रती असलेल्या श्रद्धेपोटी मी पायी आलो असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांनी गडावरील विविध वास्तू, झाडे यांची माहीती घेतली. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी त्यांनी पाळण्याची तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली. शिवकुंज येथील शिवाजी महाराज आणि बालशिवबांच्या प्रतिमेचे दर्शन घेताना राज्यपाल नतमस्तक झाले. शिवकुंज इमारती जवळ राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!