शरद पवार यांच्या आवाजात उद्योजक प्रतापराव खांडेभराड यांना धमकी, परिसरात खळबळ, तीन आरोपींना मुंबई पोलिसांकडून अटक
शरद पवार यांच्या आवाजात उद्योजक प्रतापराव खांडेभराड यांना धमकी, परिसरात खळबळ, तीन आरोपींना मुंबई पोलिसांकडून अटक
महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : कडाचीवाडी (ता.खेड) येथील पी. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक प्रतापराव खांडेभराड यांच्याकडे खाजगी कर्जाच्या पैशांच्या व्यवहारातून एका व्यक्तीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने तंत्रज्ञानाचा वापर करत एका वेबसाईटच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून बनावट कॉल केला. व त्याद्वारे पैसे देऊन प्रकरण संपवण्याचे सांगितले. मात्र असा कोणताही फोन कॉल शरद पवार अथवा संबंधित कोणीही केला नसून याप्रकरणी प्रतापराव वामन खांडेभराड (वय 54, रा. कडाचीवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार धीरज धनाजी पठारे (रा. यशवंतनगर, खराडी, पुणे) आणि त्याच्या अनोळखी साथीदारांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते 9 ऑगस्ट 2021 या कालावधीत चाकण, कडाचीवाडी येथे घडला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी धीरज पठारे याच्याकडून फिर्यादी यांनी काही वर्षांपूर्वी आर्थिक कर्ज घेतले होते. कर्जाच्या रकमेला आरोपीने चक्रवाढ व्याज लावल्याने एक कोटी रुपयांची कर्जाची रक्कम व्याज वाढवून पाच कोटी एवढी केली. फिर्यादी कर्ज फेडू न शकल्याने त्याबदल्यात आरोपीने फिर्यादी यांची 13 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यानंतरही आरोपीने पैसे देण्यासाठी फिर्यादी यांच्याकडे तगादा लावला.
फिर्यादी, त्यांच्या पत्नी आणि मेहुण्याला आरोपी धीरज याने वारंवार फोन करून धमकी दिली. 30 मे रोजी फिर्यादी यांच्या घरी येऊन आरोपीने ‘व्याजाचे पाच कोटी रुपये द्याच’ म्हणत खंडणी मागितली. पैसे न दिल्यास माझ्याशी गाठ आहे. तुम्हाला बघून घेईन. तुम्हा दोघांना जिवंत सोडणार नाही. कोणत्याही प्रकारे तुम्हाला संपवून टाकीन, अशी धमकी देखील आरोपीने दिली.
आरोपी धीरज याने 9 ऑगस्ट रोजी एका वेबसाईटचा वापर करून अज्ञात व्यक्ती मार्फत शरद पवार यांच्या आवाजाची नक्कल करून धीरज पठारे याचे पैसे देऊन टाक. व प्रकरण संपवून टाक.अशा आशयाचा फोन कॉल केला. याबाबत भारतीय दंड विधान कलम 387, 504, 506, 507, 34, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 सी, 66 डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी धीरज याच्या विरोधात मुंबई पोलिसांत देखील एक गुन्हा दाखल झाला असून त्यात त्याला व त्याचे साथीदार किरण काकडे व गुरव नावाच्या इसमास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी धीरज व त्याचे साथीदारांना पिंपरी चिंचवड पोलीस चाकण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करून घेणार असल्याचेही कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
००००