शिक्षणाला वयाचे बंधन नसते…६० व्या वर्षी दिली पत्रकारितेची परीक्षा…
सतीश चांभारे यांनी ६० व्या वर्षी पत्रकारिता परीक्षेत मिळविले ९० टक्के मार्क्स
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे (सुपेकर) यांनी वयाच्या ६० व्या वर्षी पत्रकारितेची परीक्षा देऊन ९०% मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाले असून सेवानिवृत्त झाल्यानंतरही पदविका परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. शिक्षणाला वय नसते, हेच त्यांनी आजच्या तरुण पिढीला दाखवून दिले आहे.
सतीश चांभारे हे कृषी उत्पन्न बाजार समिती खेड सेवेतून दीड वर्षापूर्वी ३३ वर्षांच्या सेवापूर्ती नंतर नियत वयोमानानुसार सचिव पदावरून सेवानिवृत्त झाले. शिक्षणाची आवड, कठोर परिश्रम करण्याची जिद्द, चिकाटी, प्रगल्भ आत्मविश्वास, अभ्यास करण्याची वृत्ती असल्याने त्यांनी सेवानिवृत्तीनंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे पुणे येथील अविनाश धर्माधिकारी यांचे चाणक्य मंडळ या केंद्रात वृत्तपत्रविद्या व जनसंपादन ( पत्रकारिता ) पदविका या एक वर्षाच्या शिक्षण क्रमासाठी प्रवेश घेतला होता.
सदरील परीक्षेचा निकाल विद्यापीठाकडून नुकताच जाहीर झाला असून चांभारे ही परीक्षा ९०% मार्क मिळवून उत्तीर्ण झाले. चांभारे यांनी यापूर्वी एम. कॉम, एच. डी. सी. डी. सी. एम, जी. डी. सी अँड ए या पदव्या संपादन केलेल्या आहेत. शिक्षणाला वयाचे बंधन नसते हेच यावरून दिसून येते. वयाच्या साठाव्या वर्षी चांभारे यांनी हे यश संपादन केल्यामुळे त्यांच्यावर खेड तालुक्यातील सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.