Saturday, August 30, 2025
Latest:
कोरोनापुणे शहर विभागविशेष

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करा -विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या सूचना

पुणे, दि.17 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या आढावा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
कोरोना विषाणू प्रार्दुभाव निर्मूलन आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, आदिवासी संसोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा नाईक आदि उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोविड-19 च्या अनुषंगाने रुग्णांवर उपचार करीत असलेल्या रुग्णालयांचे लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे. काही खाजगी रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच काही खाजगी रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर वाढीव दर आकारणी करीत असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबी गंभीर असून कायद्याचे उल्लघंन करण्याऱ्या आहेत. रुग्णांवर उपचाराअंती देण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकांची तपासणी करण्यासाठी पाच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबरोबरच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत कोवीड-19 च्या अनुषंगाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. 21 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा आरक्षित करणे. त्याचबरोबर रुग्णालयातील उपलब्ध असलेले बेडस्, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, खाजगी रुग्णालयात आरक्षित असलेले विलगीकरण कक्ष तसेच रुग्णालयात रुग्णांवर उपचार केल्यानंतर देण्यात येणाऱ्या खर्चाबाबतचा आढावाही घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!