राज्यातील ‘या’ अधिकाऱ्यांचे शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन
राज्यभरातील कृषी विभागाचे राजपत्रित अधिकाऱ्यांचे शुक्रवारी एकदिवशीय सामूहिक रजा आंदोलन
कृषी अधिकारी कार्यालयातील रिक्त पदे भरण्याच्या प्रशासनाच्या उदासिनतेच्या निषेधार्थ पुकारले आंदोलन
महाबुलेटिन न्यूज : हनुमंत देवकर
पुणे : तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतील रिक्त पदे भरण्याबाबत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ कृषिसेवा वर्ग-२ संवर्गातील राज्यभरातील सर्व राजपत्रित अधिकारी शुक्रवारी ( दि. २८ ) एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. दरम्यान याबाबतचे निवेदन कृषिमंत्री दादा भुसे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनानुसार, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बहुतेक सर्व योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, मृदुसंधारण कामे, पंतप्रधान पीक विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचाई योजना, सांख्यिकी, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, राष्ट्रीय फलोत्पादन, जमीन आरोग्य पत्रिका अभियान, वेळोवेळी घोषित केले जाणारे कृषिविस्तार विषयक कार्यक्रम, सप्ताह, पंधरवडे, गुणनियंत्रण आदी विषयक कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे व क्षेत्रीय स्तरावरील रिपोर्टींगचे महत्वपूर्ण कार्य तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत केले जाते. मात्र, सध्यस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमधील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, अनुरेखक, मिनिस्टरिअल स्टाफ मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहे. हा स्टाफ प्राधान्याने भरण्याबाबत सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनास वेळोवेळी विनंती करण्यात आली होती, तरीही अद्याप कार्यवाही झाली नाही, त्यामुळे राज्यातील सर्व कृषी अधिकारी शुक्रवारी एकदिवशीय रजा आंदोलन कारणार आहेत.