Monday, October 13, 2025
Latest:
महाराष्ट्रमीडियामुंबईविशेष

राज्यातील पत्रकारांचे राज्यपालांना साकडे… ● महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे : विविध संघटनांची मागणी ● पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात आजच आपण राज्य सरकारला पत्र लिहिणार : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यातील पत्रकारांचे राज्यपालांना साकडे…
● महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे : विविध संघटनांची मागणी
● पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात आजच आपण राज्य सरकारला पत्र लिहिणार : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई ( दि. 1 जून ) : “महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे” या मागणीसाठी पत्रकारांच्या विविध संघटनांनी आज मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन दिले. “पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात आजच आपण राज्य सरकारला पत्र लिहिणार असल्याचे” राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळास सांगितले.. 

महाराष्ट्रातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून जाहीर करावे, त्यांचे लसीकरण करावे, पत्रकारांवर व्यवस्थित उपचार व्हावेत, मुंबईत पत्रकारांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी या मागण्यांसाठी राज्यातील पत्रकार गेली चार महिने राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र सरकार त्याची दखल घेत नसल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष आहे. पत्रकारांनी मेल पाठवा आंदोलन केले, आत्मक्लेष आंदोलन केलं, जवळपास बारा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून जाहीर करावे अशी मागणी केलेली आहे, तरीही राज्य सरकार पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा करीत आहे..

देशातील पंधरा राज्यांनी पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.. हे सारं वास्तव वारंवार राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील सरकार आपले मौन सोडायला तयार नाही.. त्यामुळे मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए, बीयुजे आदि संघटनांनी आज राज्यपालांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्या कानी घातली.. पंधरा मिनिटे चाललेल्या या बैठकीत राज्यपालांनी पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आजच राज्य सरकारला पत्र लिहितो, असं स्पष्ट केलं. राज्यात 140 पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले, पत्रकारांच्या दोनशेवर नातेवाईकांचे निधन झाले, मृतांमध्ये तरूण पत्रकारांची संख्या अधिक असल्याचे वास्तव राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनीही चिंता व्यक्त केली..

आज राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, नवराष्ट़चे संपादक राजा आदाटे, दीपक कैतके, स्वप्नील नाईक आदि उपस्थित होते..
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!