राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी घेतला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी घेतला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
पुणे दि.12 : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी आज जिल्हा निवडणूक आराखडयानुसार राज्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीबाबतचा आढावा घेतला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन), सर्व प्रादेशिक सहसंचालक (साखर), सर्व प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) व सर्व विभागीय उपनिबंधक (दुग्ध) तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये निवडणूक प्रयोजनार्थ नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी प्राधिकरणाने तयार केलेली हस्तपुस्तिका व परिपत्रकीय संच या दोन्ही पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपासुन सुरु करण्याबाबत निर्देश देत आयुक्त डॉ. जगदीश पाटील म्हणाले, प्रथम टप्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया एकाचवेळी सुरू करावयाच्या असल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. तसेच आवश्यकता असल्यास शासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांची सेवा निवडणूक कामकाजासाठी घेण्यात यावी. कोविडबाबतच्या आवश्यक त्या उपाययोजना करुन निवडणूक प्रक्रिया सुरु करुन विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
निवडणूक खर्चात काटकसर करावी. सहकारी संस्थांच्या निवडणूका नियमानुसार, पारदर्शकपणे, भयमुक्त व नि:पक्षपाती वातावरणात पार पडतील यासाठी सर्व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी व तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांनी दक्ष राहण्याच्या सुचना डॉ. जगदीश पाटील यांनी दिल्या. यावेळी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
—–