Sunday, April 20, 2025
Latest:
निवडणूकमहाराष्ट्रराजकीय

राजकीय साठमारीत ‘दादा’ स्वगृही….! शिंदे गटात जाऊन साधले काय?

शिवाजी आतकरी
महाराष्ट्रीय राजकारणाचे धिंडवडे निघाले आहेत. यास खरे कारण ईडी, सीबीआय यांच्या सदोष कामकाजप्रमाणेच भाजपा आणि तथाकथित भ्रष्ट काही सर्वपक्षीय राजकीय नेते आहेत. सत्ता मिळवणे आणि आर्थिक पापे झाकण्यासाठी राजकीय साठमारी सुरू आहे. या साठमारीचा एका अर्थाने राजकीय बळी शिरूरमध्ये पाहायला मिळाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून सुरू झालेला राजकीय प्रवास, मूळ शिवसेना, शिंदे सेना आणि राजकीय साठमारीतील अपरिहार्यतेने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राहिला. या घटनेला अनेक कंगोरे असल्याने निवडणुकीत ते महत्वाचे ठरतील हे नक्की.

आढळराव पाटील यांचा राजकीय प्रवास आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर कारखाना उभारणी व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष असा सुरू झाला. कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नसणाऱ्या आढळराव पाटील यांनी 2004 साली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने लढवय्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी मुसंडी मारीत मात्तबर शरद पवार, अजित पवार, वळसे पाटील यांच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला होता. 2009 साली पुन्हा मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी धूळ चारली. 2014 साली हॅट्रिक साधत त्यांनी शिवसेनेत त्यांनी आपले वजन भक्कमपणे वाढवले. या पंधरा वर्षात लोकसभा मतदारसंघात त्यांना ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये त्यांना ठळक कामगिरी करण्यात अपयश आल्याचे इतिहास सांगतो.

वानगीदाखल सांगायचे झाल्यास त्यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील यांनाही ते विधानसभा निवडणुकीत विजयी करू शकले नाही. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने मराठी मनावर गारुड गेलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी चौथ्या वेळेस मात्र आढळराव यांच्या गडावर यशस्वी चढाई करून विजय मिळवला. हा थोडक्यात त्यांच्या निवडणुकांचा इतिहास झाला.

जनसंपर्कात कायमच उजवे राहिलेल्या आढळराव पाटलांनी जनसंपर्क पराभवानंतर तसूभरही कमी केला नाही. आजही हे त्यांचे बलस्थान असल्याचे मतदारसंघातील जनता सांगते. अशा पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी बदलत्या राजकीय गणिताआधारे घेतलेल्या भूमिकेबद्दल मतदारसंघात संमिश्र मते आहेत. त्यांच्या स्तुतीपाठकाना कदाचित हे पटणार नाही, मात्र वस्तुस्थितीचा अंदाज त्यांनी घ्यायला हवा. यास कारण सांगितले जाते की, पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा चेहरा राहिलेल्या आढळराव पाटलांवर सतत शिवसेनेने विश्वास दाखवला. दस्तुरखुद्द हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटलांसाठी घेतलेल्या सभा, केलेली पाठराखण यांमुळे ते पवारांच्या जिल्ह्यात टिच्चून उभे राहिले, लढले आणि स्वतःचे नेतृत्व उभे केले. हा काळ तब्बल वीस वर्षांचा राहिला. पवार विरोधातील निष्कलंक नेता ही आढळराव पाटलांची प्रतिमा जनसामान्यांच्या मनात रुजली. त्यामुळे जसा मतांसाठी त्यांनी जनतेवर हक्क सांगितला, तसाच जनतेनेही आमचा नेता म्हणून अपेक्षा बाळगल्या. येथेच अपेक्षाभंग अर्थात भ्रमनिरास ढळढळीत समोर आल्याचा जनमानसाचा कानोसा घेताना लक्षात येते.

भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँगेस फोडली, मॅच फिक्सिंग प्रमाणे पक्ष व चिन्हे दोन्ही पक्षांची पळवली गेली. याची एक सहानुभूतीची लाट खेड्यापाड्यात दिसून येतेय. ही लाट सहज घेण्यासारखी नाही. वीस वर्षे पवारांना विरोध करणाऱ्या आढळराव पाटलांनी ठाकरे शिवसेनेला सोडचिट्ठी दिली व शिंदेशाही जवळ केली. राजकीय साठमारीत ज्यांना कडाडून विरोध केला त्या अजित पवारांच्या गोटात सामील झाले. ही एक अर्थाने तत्वांना दिलेली तिलांजली म्हणावी लागेल. दादा असे नव्हते, हे बोलके वाक्य अलीकडे कानी पडते, ते जनतेचा सूर सांगून जाते.

या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांचे अलीकडचे दोन पक्षप्रवेश जनतेला तितकेसे पटलेले नाहीत. हे पाहता त्यांना आगामी प्रचारकाळात ठोस भूमिका व पक्षबदलाची सबळ कारणे घेऊन मतदारांपर्यंत पोहचावे लागेल. हे करताना त्यांच्या अवतीभोवतीच्या भाटांचे मोघम सल्ले, सोशल मीडियावर त्यांच्या स्तुतिपाठकांनी वस्तुनिष्ठ न केलेली मांडणी यापलीकडे आढळराव पाटलांनी पहावे व प्रभावी भूमिका पुन्हा पहिल्यासारखी मांडणे, असे तटस्थपणे विचार केल्यास वाटते. दुर्घटनासे दुरुस्ती भली… या संकेतावर दादांनी काम करायला हवे, असा जनतेचा आवाज सांगतो. स्वतःचा राजकीय बळी साठमारीत जायला नको, याबद्दल सतर्कतेचा संदेश जनतेतून येतोय याचा कानोसाही त्यांनी घ्यायला हवा हे मात्र नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!