राजगुरूनगर सहकारी बँकेच्या चार शाखा पुढील निर्णय होईपर्यंत ‘लॉकडाऊन’
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पाईट शाखेतील दोन व राजगुरूनगर मधील टिळक चौक शाखेतील आठ सेवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या दोन शाखा तसेच मंचर व नारायणगाव परिसर उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केल्याने बँकेच्या मंचर व नारायणगाव शाखा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष गणेश थिगळे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून आता समूह संक्रमणाला सुरुवात झाली असल्याचे चित्र हळूहळू दिसू लागले आहे. त्यातच उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या राजगुरुनगर सहकारी बँकेतील दोन शाखांमधील एकूण दहा कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बँकेच्या खेड तालुक्यातील दोन व जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण चार शाखा पुढील निर्णय होईपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.
पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात 17 शाखांच्या माध्यमातून बँक ग्राहकांना उत्तम सेवा देते. सध्या महामारीच्या काळात देखील बँक कर्मचारी कोरोना योध्यासारखी ग्राहक सभासदांना सेवा देत आहेत. मात्र आता पाईट व राजगुरुनगर येथील बँकेच्या 10 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
नागरिकांनी व बँक कर्मचाऱ्यांनी घाबरून न जाता सोशल डिस्टन्स पाळून आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग व एटीएमचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन अध्यक्ष गणेश थिगळे यांनी केले आहे. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या 10 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत: पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.