वाडेबोल्हाईचे सुपुत्र रघुनाथ गावडे यांची आय.ए.एस. पदी पदोन्नती
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई गांवचे सुपुत्र रघुनाथ खंडू गावडे यांना केंद्र शासनाने आय.ए.एस. पदी पदोन्नती दिली आहे.
अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास केला. सन 1995 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. त्यानंतर महसूल विभागात त्यांनी विविध ठिकाणी काम केले. नाशिक येथे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची प्रथम नियुक्ती, शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे पुनर्वसन अधिकारी म्हणून तळोदा जि. नंदुरबार येथे करण्यात आली. तेथे त्यांनी प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे काम उत्कृष्टपणे केले आणि आपल्या कामाचा ठसा उमटविला.
त्यानंतर त्यांची नियुक्ती धुळे जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून करण्यात आली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. धुळे जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अन्नधान्य वितरणाचे काम चोखपणे पार पाडले. तसेच इंधनात भेसळ करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाया केल्या.
त्यानंतर त्यांची सन 2001 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे प्रांताधिकारी या महत्वाच्या पदावर नेमणूक झाली. तेथे त्यांनी सुमारे चार वर्षे उत्कृष्टपणे काम केले. या कालावधीत त्यांनी लोकसभा, विधानसभा, साखर कारखाने, नगरपालिका यांसारख्या निवडणुकांचे कामकाज अत्यंत चोखपणे पार पाडले. या काळात मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान यांच्या विविध दौऱ्यांसमयी ओझर विमानतळ येथे राजशिष्टाचार व त्या संबंधातील कामे त्यांनी चोखपणे पार पाडली. सन 2006 ते 2010 या कालावधीत त्यांनी नाशिक विभागात एम. आय. डी. सी. चे प्रादेशिक अधिकारी म्हणून नाशिक महसूल विभागाचे कामकाज पाहिले. त्यांच्या काळात सिन्नर येथील एस. ई. झेड. प्रकल्पाचे भुसंपादन यशस्वीरित्या पूर्ण झाले, तसेच उद्योगवृध्दी साठी त्यांनी विविध ठिकाणी एम. आय. डी. सी. स्थापन करण्याचे प्रस्ताव शासनास सादर करून ते मंजूर करवून घेतले.
त्यानंतर सन 2011 ते 2014 या कालावधीत त्यांनी अपर जिल्हाधिकारी, मालेगाव या अतिशय संवेदनशील व महत्वाच्या पदावर काम केले. तिथे त्यांनी हिंदू-मुस्लिम समाजात एकोपा वाढवण्यासाठी व समाजिक ऐक्य निर्माण होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मालेगाव येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यानंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने सन 2014 साली दर बारा वर्षांनी होणाऱ्या नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी ‘मेळा अधिकारी’ या अत्यंत महत्वाच्या पदावर केली. सदरचे कुंभमेळा नियोजन हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व अचूक ठरले. या संपूर्ण नियोजनात कुठेही त्रुटी राहीली नाही. त्यामुळे एकही दुर्घटना न होता अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने सन 2014 ते 2016 या कालावधीतील हा कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला. सदर उत्कृष्ट नियोजनाची दखल अमेरिका देशात देखील घेतली गेली व या उत्कृष्ट कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मध्यप्रदेश राज्याने देखील त्यांना उज्जैन येथील कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मार्गदर्शन करणेकामी निमंत्रित केले होते.
त्यानंतर सन 2017-2020 या कालावधीत त्यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (महसूल) व उपायुक्त (सामान्य प्रशासन) या पदावर लक्षणीय काम केले. या कालावधीत त्यांनी विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका संदर्भातील काम चोखपणे पार पाडले. कोरोना विषाणू नियंत्रणा संदर्भात त्यांनी नाशिक विभागासाठी ‘विभागीय नोडल अधिकारी’ म्हणून कामकाज पाहिले.
या संपूर्ण सेवाकाळातील पंचवीस वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामाची दखल घेऊन महाराष्ट्र व केंद्र शासनाने त्यांची आय.ए.एस. या प्रतिष्ठेच्या पदी पदोन्नती केली आहे. या संपूर्ण कालावधीत त्यांना त्यांचे बंधू विठ्ठल खंडू गावडे व पत्नी रूपाली यांनी मोलाची साथ दिल्यामुळे ते सदर यश संपादन करू शकले आहेत. त्यांच्या पदोन्नतीमुळे वाडेबोल्हाई गाव व पंचक्रोशीमधील नागरिक तसेच संपूर्ण हवेली तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे, तसेच विविध मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.