पुण्यात आघाडीत बिघाडी… पुढच्यावेळी महाविकास आघाडी असो की नसो, आमदार मात्र शिवसेनेचाच असणार, दिलीप मोहितेंना पाडणार : संजय राऊत
पुण्यात आघाडीत बिघाडी… ढच्यावेळी महाविकास आघाडी असो की नसो, आमदार मात्र शिवसेनेचाच असणार, दिलीप मोहितेंना पाडणार : संजय राऊत
आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना करावा, नाहीतर शिवसेनेला मुभा द्यावी, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी आज खेड मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड पंचायत समिती सदस्यांच्या पळवापळवीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कारभार योग्यरित्या सुरु असताना खेडमध्ये जे घाणेरडं राजकारण सुरु आहे, ते आघाडीला शोभा देणारं नाही. जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील. पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा बंदोबस्त पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना करावा, नाहीतर शिवसेनेला मुभा द्या, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर खेड पंचायत समितीच्या नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेले बहुतांश पंचायत समिती सदस्य पुन्हा सहलीवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आज थेट खेड शिवसेना कार्यालयात पोहोचले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली आहे. पंचायत समितीच्या जागेवरुन हे रेटून नेत आहेत, त्यांना माज आलाय असंच म्हणावं लागेल. थोडीफार सत्ता आहे, म्हणून माज करु नका, शिवसेना उत्तर देईल. पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेलं, दहशतीने पळवून नेलं. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत हा विषय नेला जाईल, पण हे राजकारण घाणेरडं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
● तर पुढचा आमदार शिवसेनेचा असेल : राऊत
खेड पंचायत समिचीचा विषय आमच्यासाठी संपलाय. आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर काय करायचं हे आम्ही पाहू. मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर पुढील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो की नसो, इथे मात्र शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येईल, असा इशाराच राऊत यांनी दिला.
● अजित पवारांना आवाहन
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पळवून नेल्याच्या प्रकारानंतर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे अजित पवारांनी लक्ष द्यावं. त्यांना हे शक्य होणार नसेल तर त्यांनी हा विषय शिवसेनेकडे सोपवावा. शिवसेना काय ते बघून घेईल, असंही संजय राऊत म्हणाले.
● ‘शिवसेनेनं बांगड्या भरल्या नाहीत’
शिवसेनेचे जे पंचायत समिती सदस्य गेले किंवा पळवून नेले त्यांचा बंदोबस्त आम्ही करु. विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा वारु नेहमीच उधळलेला असतो. पण शिवसेनेनंही बांगड्या भरलेल्या नाहीत. आमच्या स्वाभिमानाचा मुद्दा येतो तेव्हा शिवसेना आणि शिवसैनिक सर्व बंधनं झुगारुन मैदानात उतरतो. आम्ही काय करु शकतो हे खेडमध्ये दाखवून देऊ. हा इशारा त्यांच्यासाठी आहे ज्यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटावर पाय ठेवलाय, अशा शब्दात संजय राऊत यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर शरसंधान साधलं.
● खेड पंचायत समितीचा नेमका वाद काय?
खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केले आहे. सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी संपायला 9 महिने बाकी असतानाच पद मिळवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेत मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. सर्व पक्षीय 14 पैकी 11 सदस्यांनी आणि सेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव आणल्याची माहिती मिळाली असून, यात राष्ट्रवादीच्या 4 सदस्यांचा सहभाग असल्याचेही बोलले जात आहे. तर दुसरीकडे सभापती भगवान पोखरकर यांनी सेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे राजीनामा दिल्याचं सांगितले आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे दिलीप मोहितेंचा हात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
००००