Saturday, August 30, 2025
Latest:
आंदोलनकृषीखेडनासिकपिंपरी चिचंवडपुणेपुणे जिल्हाप्रशिक्षणमहाराष्ट्रविशेष

पुणे-नासिक रेल्वे प्रकल्प व रिंग रोड जमीन संपादन विरोधात राजगुरूनगर मध्ये ‘शोले स्टाईल’ आंदोलन..

पुणे-नासिक रेल्वे प्रकल्प व रिंग रोड जमीन संपादन विरोधात राजगुरूनगर मध्ये ‘शोले स्टाईल’ आंदोलन..

महाबुलेटीन न्यूज । नाजीम इनामदार
राजगुरुनगर : पुणे रिंग रोड व रेल्वे प्रकल्पाच्या जमीन संपादनाच्या विरोधात आठ दिवसांपासून आंदोलनासाठी बसलेल्या आंदोलकाची शासनाने कोणतेही दखल न घेतल्याच्या निषेधार्थ आज (दि.६ जुलै) सकाळी ६ वाजता रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरूनगर येथील प्रांत कार्यालयासमोरील नगर परिषदेच्या पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन ‘शोले स्टाइल’ आंदोलन करून शासनाचे व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधुन घेतले.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातुन जाणाऱ्या बारा गावातील रेल्वे मार्ग व रिंग रोडला विरोध करण्यासाठी तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, च-होली, धानोरे, सोळू, मरकळ गावातील बाधित शेतक-यांनी खेड प्रांत कार्यालयासमोर गेली नऊ दिवसांपासून “ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषण” सुरू केले. मात्र प्रशासनाने याबाबत दखल घेतली नाही. त्यामुळे समितीने आंदोलन तीव्र केले. आज दि ६ रोजी रिंग रोड व पुणे-नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पाटीलबुवा गवारी यांनी राजगुरु नगर येथील प्रांत कार्यालयासमोरील  नगर परिषदेच्या पानी पुरवठा टाकीवर चढून थरारक आंदोलन करून महसूल व पोलिस प्रशासनला जागे करण्याचा प्रयत्न केला. 

घटनास्थळी पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी पाटील गवारी यांना खाली येण्यासाठी सांगितले. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही खाली येण्यासाठी सांगूनही त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. जो पर्यंत सरकार यात लक्ष घालत नाहीत, रिंग रोड रद्द करत नाही, तसे लेखी देत नाहीत; तोपर्यंत खाली येणार नाही, अशी भूमिका घेतली. या दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेने बघ्याची मोठी गर्दी झाली होती.

आंदोलक पाटील बुवा गवारे टाकीवरून खाली उतरले.. 

साडेचार तासांच्या थरारानंतर अखेर आंदोलक पाटीलबुवा गवारी यांची मनधरनी करून आणि प्रांत साहेब स्वतः येऊन चर्चा करण्याचे सांगितल्यानंतर व त्यांच्यासह आंदोलकांवर कोणताही गुन्हा दाखल न करण्याचा आश्वासनानंतर अखेर पाटीलबुवा गवारी टाकीवरून खाली उतरले.

माजी सभापती कल्पना गवारी प्रांताधिकाऱ्यांसमोर आक्रमक झाल्या…

घटनास्थळी आंदोलक पाटीलबुवा गवारी यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी यांनी आक्रमक भूमिका घेतली. आठ दिवसापासून चाललेल्या आंदोलनाला शासन दखल घेत नाही व प्रांत अधिकारी देखील  चर्चा करीत नाही. या दरम्यान काही बरं वाईट झाल्यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल. प्रांत अधिकारी यांनी तत्काल घटना स्थळी येऊन चर्चा करावी, अशी भूमिका घेतली.

अखेर कल्पना गवारी, डी. वाय. एस. पी. लंभाते, पोलिस निरीक्षक सतीश गुरव, तहसीलदार वैशाली वाघमारे हे प्रांत कार्यालयात गेले. कल्पना गवारी त्यांचे  सहकारी आंदोलकानी प्रांत अधिकारी यांना आठ दिवसा पासून चाललेल्या घटनेचा आक्रमक पणे व्यथा मांडल्या, तदनंतर अखेर प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण घटनास्थळी आल्यानंतर त्यांनीही गवारी यांना टाकीवरून खाली येण्याची व चर्चा करण्याची विनंती केली; मात्र ते त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. अखेर त्यांचे आंदोलक सहकारी टाकीवर गेले, त्यांनी विनंती केली; मात्र खाली येण्यास नकार दिला. अखेर बळजबरीने पाटीलबुवा गवारी यांना खाली आणण्यात आले. 

त्यानंतर प्रांत कार्यालयात चर्चा करण्यात आली. मागण्या लेखी स्वरूपात द्या, त्या वरिष्ठांना कळवू, त्यांना आंदोलनाची सर्व कल्पना दिली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत पुढचा निर्णय जिल्हाधिकारी देतील आंदोलन मागे घ्यावे, असे प्रांत अधिकारी चव्हाण यांनी आंदोलकांना सांगितले. तोडगा निघाला नाही; तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!