पुणे-नासिक रेल्वे मार्गाच्या मोजणीला ग्रामस्थांचा हिरवा कंदील… ● भूसंपदानाबाबत बैठक संपन्न…
पुणे-नासिक रेल्वे मार्गाच्या मोजणीला ग्रामस्थांचा हिरवा कंदील…
● भूसंपदानाबाबत बैठक संपन्न…
महाबुलेटीन न्यूज
चाकण ( पुणे ) : रेल्वे अधिकारी, प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये आज शनिवार (दि. 22) रोजी जरे लॉन्स मंगल कार्यालय रासे ( ता.खेड ) या ठिकाणी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-नासिक रेल्वे मार्गाच्या संदर्भात बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकित समर्पक उत्तरे मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रासे गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. 27) रेल्वे मार्गाची मोजणी होणार आहे. या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध नसला तरी अनेक प्रश्न शेतकऱ्यांन भोवती प्रश्नचिन्ह ठाकत उभे आहेत.
आज प्रशासनाने रेल्वे भूसंपादनाच्या बाबत रासे या गावांतील शेतजमीन खातेदारांची गावामध्ये बैठक घेऊन त्यांना या भूसंपादनाबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. ज्या खातेदारांची जमीन यामध्ये जाणार आहे, त्यांची काही जमीन म्हणजे जमीन रेल्वे ट्रॅकच्या एका बाजूला शिल्लक राहणार आहे. या जमिनीत त्यांना शेती पिकवणे वहिवाट करणे हे अशक्य होणार आहे. रेल्वे रुळाच्या बाजूला किती मीटर अंतरावर डेव्हलपमेंट करता येणार नाही. याबाबत कोणते नियम आहेत याची माहिती रेल्वे विभागाने जाहीर करावी. रेल्वे ट्रॅकचे एका बाजूकडून दुसरीकडे जात असताना त्यासाठी ज्या ठिकाणी बोगदे ठेवलेले आहेत तेथून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी रेल्वेच्या संपादन केलेल्या जागेमधून रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे काय? होणारी पुणे-नाशिक रेल्वे ही सेमी हायस्पीड असल्यामुळे रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला कंपाऊंड केले जाणार आहे का? असे प्रश्न ग्रामस्थांनी प्रशासनाला बैठकीत उपस्थित केले.
या प्रश्नांची उत्तरे रेल्वे अधिकारी व खेड महसूल प्रशासनाने समाधानकारक दिली असली तरी तालुक्यातील इतर गावामध्ये होणारा विरोध प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे.
रेल्वे प्रशासनाने जमीन संपादित करताना ज्या गटातुन रेल्वे जाणार आहे त्या गटातील सर्व शेतकऱ्यांना विचारात घेऊन योग्य ती पावले उचलली पाहिजे, गावातील शेतीला जाणाऱ्या रस्त्यातून रेल्वे जाणार असल्याने पर्यायी व्यवस्था शेतकऱ्यांची करणे गरजेचे असल्याचे मत माजी सरपंच विजय शिंदे यांनी व्यक्त केले.
रासे गावातील 2.86 हेक्टर जमीन पुणे-नाशिक रेल्वेसाठी भूसंपादित करण्यात येणार असून गावातील नागरिकांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जरी कोणत्या शेतकर्यांचे काही प्रश्न असेल तर ते प्रशासनाशी संपर्क साधू शकतात, असे रासे गावच्या तलाठी सारिका विठे यांनी सांगितले आहे.
०००००