Tuesday, July 8, 2025
Latest:
नासिकमहाराष्ट्रमुंबई

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे
मुंबई, दि. ७:
पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्ग हा औद्योगिक, व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वेळेचा, इंधनाचा आणि मनस्तापाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याशिवाय, या महामार्गावर नियमितपणे टोल आकारला जात असतानाही रस्त्याच्या गुणवत्तेत व सुरक्षिततेत कोणतीही सुधारणा झालेली नाही, हे दुर्दैवी आहे.

तसेच, नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाट, इगतपुरी परिसरातील खराब रस्त्यांची अवस्था, खराब दर्जाचे डायव्हर्जन आणि पुलांचे अपूर्ण काम ही वाहतुकीस धोका निर्माण करणारी बाब असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. या मार्गावरही गंभीर अपघात घडत असून या दोन्ही महामार्गांची सखोल पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कार्यक्षमता आणि पायाभूत विकासातील योगदान लक्षात घेता, त्यांच्या माध्यमातून या दोन्ही महामार्गांची दुरुस्ती तातडीने पूर्ण होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!