Thursday, April 17, 2025
Latest:
पुणे जिल्हाप्रशासकीयमावळविशेष

प्रशासकीय कामकाजाचा लेखाजोखा सभागृहातील सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर मंजूर करण्याचा डाव : विरोधी पक्ष नेत्यांचा आरोप

 

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारी सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात व्हावी, अशी विरोधकांची मागणी

महाबुलेटीन न्यूज : अंकुश दाभाडे
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर १४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच तुटीच्या अर्थसंकल्पाचे गंडांतर ओढवले असून प्रशासकीय कामकाजाचा लेखाजोखा सभागृहातील सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर मंजूर करण्याचा डाव नगराध्यक्षा करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. येत्या गुरुवारी ( दि.१७ ) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारी सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात व्हावी, अशी मागणी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे आणि जनसेवा विकास समितीचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांनी केली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी आणि नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना लेखी पत्र दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १०७ विषय सभेच्या पटलावर  आहेत.

तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समितीने आक्षेप घेतला असून सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा किशोर भेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. नागरिकांच्या हितासाठी फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करून ही महत्वाची सभा नगरपरिषद सभागृहात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

किशोर भेगडे म्हणाले, की नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. जनहित महत्वाचे आहे. वेळप्रसंगी सत्तारूढ पक्षाच्या मनमानी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरू, लोकशाही मार्गाने आंदोलने उभारू. नगराध्यक्षांना सार्वजनिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यास कोरोनाची भीती वाटत नाही; मात्र नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या आणि विकासाभिमुख विषयावर सभागृहात चर्चा करण्यासाठी कोरोनाची भीती वाटते. यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे, असा आरोप  त्यांनी केला.

गणेश खांडगे म्हणाले, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही. अनागोंदी कारभार चालू आहे. सभागृहात सर्व नगरसेकांच्या उपस्थितीत सभा घेण्याचे धाडस नगराध्यक्षांमध्ये नसावे. हे नागरी हिताचे नाही. नगराध्यक्षांचा मनमानी आणि अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणूनच सभागृहात सभा घेण्याचे त्या टाळत आहेत. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. नगरपरिषदेत नगरसेवकांना विश्वासात न घेता ही सभा घेण्यात येत आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा कुटील डाव साध्य होऊ देणार नाही.  

गणेश काकडे म्हणाले, की सभागृहात चर्चा न करता अशा पद्धतीने आर्थिक कामकाजाना मंजुरी दिली गेली तर तळेगाव शहराचा विकास ५० वर्षे मागे जाईल. नागरिकांना त्यांनी भरलेल्या पैशाचा विनियोग कसा केला जातो आहे हे जाणण्याचा अधिकार आहे आणि नगराध्यक्षा तोच डावलत आहेत. आम्ही या अनागोंदी कारभाराचा निषेध करतो. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून कामकाज केले पाहिजे. जनहित महत्वाचे आहे. त्यासाठी वेळप्रसंगी अधिक आक्रमक भूमिका घेतली जाईल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!