Saturday, August 30, 2025
Latest:
खेडविधायकविशेष

प्रसाद मेदनकरच्या कुटुंबियांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घरी भेट देऊन केले सांत्वन

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून उचलला मेदनकर यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च
महाबुलेटीन न्यूज / हनुमंत देवकर
चाकण : परिसरातील मेदनकरवाडी ( ता. खेड ) या गावातील प्रसाद सुरेश मेदनकर यांचे नुकतेच दुर्देवी निधन झाले. आज या कुटूंबाची शिरुर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भेट घेऊन कुटूंबातील सदस्यांचे सांत्वन करुन त्यांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी या चाकण परिसरातील युवा उदयोजक व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे हे देखील खासदारांसमवेत उपस्थित होते. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने मेदनकर परिवार पोरका झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी आणि नातेवाईक असा परिवार आहे.
मोठी मुलगी कु. संस्कृती हीने नुकतेच कंम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केलेले असून लहान मुलगा कु. हर्षद हा सातवी इयत्तेत शिक्षण घेत आहे. या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वतः गणेश बोत्रे यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्विकारली असून त्यांच्या या समाजसेवी वृत्तीचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.या त्यांच्या सामाजिक भान जपणाऱ्या निर्णयामुळे हर्षदच्या स्वप्नांना बळ मिळून कुटूंबाला मोठा आधार मिळणार आहे.
या प्रसंगी खासदार कोल्हेंनी या परिवारातील मुला-मुलींना भविष्यात नोकरी देण्याबाबत सूतोवाच केले. गणेश बोत्रे यांनी आपल्या जन्मदिनाच्या निमित्ताने वाढदिवसाचा सर्व खर्च  टाळून व सध्याच्या परिस्थितीचे भान राखून सामाजिक बांधिलकी जपत या कुटूंबाला मदत केल्याने खासदार कोल्हेंनी या उपक्रमाचे कौतुक केले व श्री. बोत्रेंना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!