प्रणवदांची आतिथ्यशीलता विलोभनीय : प्राचार्य डॉ. चाकणे
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : …तत्वनिष्ठ,अलौकिक बुध्दिमान,अजोड वक्ता अश्या गुणांनी समृध्द असणा-या माजी राष्ट्रपती, भारतरत्न दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्यामध्ये असणारी विलोभनीय आतिथ्यशीलता मला विशेष भावली… तेथे त्यांच्यामधील करड्या शिस्तीचा प्राध्यापक आम्ही काहीकाळ विसरुन गेलो होतो…. इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या आठवणी जागवत होते. भूतकाळ नुकत्याच घडलेल्या वर्तमानकाळासारखाच ताजा झाला होता.
प्राचार्य डॉ.संजय चाकणे सांगत होते, इंदापूर महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजनेचे, उत्कृष्ट महाविद्यालय व इंदापूर महाविद्यालयातील प्रा.धनंजय भोसले यांना उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी हे पुरस्कार जाहिर झाले होते. दिल्लीत दि.१९ नोव्हेंबर २०१५ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार होते. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री, हर्षवर्धन पाटील, सचिव मुकुंद शहा, आपण व प्रा.धनंजय भोसले पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी गेलो होतो.
दोन दिवस आधी दरबार हॉलमध्ये रंगीत तालीम झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येण्या आधीपासून उभे राहायचे. बँडवरील राष्ट्रगीत संपेपर्यंत उभे राहायचे, ते ही दोनदा. अगदी पुरस्कारासाठी नाव पुकारल्यावर कसे पुढे यायचे. वाकून हात जोडून नमस्कार कसा करायचा. किती पावले पुढे जायचे. कुठल्या पायरीवर उभे राहायचे असे सर्व या तालमीत निश्चित करण्यात आले होते, असे प्राचार्य डॉ. चाकणे यांनी सांगितले.
शेवटी एकदाची पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होण्याची वेळ आली. आम्ही सर्व भारावून बसलो होतो. बँड सुरू झाला. ड्रमवर ठोका पडला. आम्ही ताडकन उठून उभे राहिलो. तोपर्यंत राष्ट्रपतींचे आगमन झाले. राष्ट्रगीत सुरू झाले. आम्ही पहिल्या रांगेत होतो. मी अनिमिष नेत्रांनी त्यांचेकडे पाहत होतो. त्यांची मध्यम उंचीची, तेजपुंज, गौरवर्णीय, मोठे काळेभोर डोळे असलेली, अत्यंत प्रसन्न चेहरा असलेली मूर्ती, फारच तेजस्वी वाटत होती.
कार्यक्रम संपला, त्यांचे छोटेखानी भाषण सुरू झाले. बंगाली उच्चारवाचे ते अत्यंत स्फूर्तीदायक भाषण संपूच नये असे वाटत होते. त्यांनी रासेयोचा, पुरस्कार विजेत्यांचा अत्यंत गौरवास्पद उल्लेख केला. त्यामुळे आम्ही भारावून गेलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रगीत संपल्यावर शाही भोजन होते. राष्ट्रपती प्रणवदा प्रत्येकाजवळ येऊन अत्यंत उत्तम संभाषण करत, काही न काही खाण्याचा आग्रह करीत होते. त्यांच्या त्या स्नेहार्द आर्जवी आवाजातील ते विचारलं जाणं आज ही कानात रुंजी घालतं आहे, असे सांगून आज ते गेल्याची चुटपुट लागून राहिली आहे, या शब्दात प्राचार्य डॉ. चाकणे यांनी त्यांना आदरांजली वाहिली.