Saturday, August 30, 2025
Latest:
निवडणूकमहाराष्ट्रमीडियाविशेष

पतीच्या नावांच्या साम्यपणामुळे पत्नींची वाढली डोकेदुखी… सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे मनस्ताप..

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
भिवंडी : भिवंडी तालुक्यात ग्रामीण भागात येत्या 15 तारखेला ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापली तयारीही जोरात सुरू केली आहे. यातच पक्षात असलेले वाद विवाद चव्हाट्यावर देखील आले आहेत. अशात छोटे मोठे राडे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान भिवंडी तालुक्यातील पिंपळास येथे राहणाऱ्या म्हस्के कुटुंबीयांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यामुळे मतदारसंघासह भिवंडी तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. तर सोशल मीडियावरील ही पोस्ट व्हायरल झाल्यामुळे त्या दोन्ही महिला उमेदवारांना आणि त्यांच्या वेगवेगळ्या नवऱ्यांना, घरातील सर्वांना खूप मानसिक त्रास होतोय. 

सुजाता कल्पेश म्हस्के आणि कोमल कल्पेश मस्के या पिंपळास ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वार्ड क्रमांक 4 ड मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र, या दोघींच्या पतींच्या नावाचा साम्यपणा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. कल्पेश बारक्या म्हस्के आणि कल्पेश सुरेश म्हस्के हे दोघे नातेवाईक असून कल्पेश बारक्या म्हस्के यांचा कल्पेश सुरेश म्हस्के हा चुलत भावाचा मुलगा लागतो. कल्पेश बारक्या म्हस्के यांचे 2016 साली सुजाताशी लग्न झालं तर कल्पेश सुरेश म्हस्के यांचा 2017 साली कोमलशी विवाह झाला. आता कोमल व सुजाता या दोघीही ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकाच वार्डातून शिवसेना पुरस्कृत अग्निमाता ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आहेत. मात्र, याच नावाचा साम्यपणा मतदारांसह त्यांनाही गोंधळात पाडतोय. आता याचा परिणाम निवडणुकीत काय गोंधळ घालतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येईल.

■ घरातील सर्वांना मानसिक त्रास : पतींच्या नावात साम्य असल्याने एकाच वार्डात नवऱ्याने आपल्या दोन बायकांना उभे केले, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळे या दोन्ही महिला उमेदवारांना आणि त्यांच्या वेगवेगळ्या नवऱ्यांना, घरातील सर्वांना खूप मानसिक त्रास होतोय.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!