Thursday, April 17, 2025
Latest:
खेडनागरी समस्यापुणे जिल्हाप्रशासकीयविशेष

पालकमंत्र्यांच्या बैठकीत भामा-आसखेडचा तिढा सुटला नाही तर आंदोलन पेटणार : आंदोलक शेतकरी

प्रकल्पग्रस्त शेतकरी व जिल्हाधिकारी यांची आजची बैठक फिस्कटली, उद्या होणार पालकमंत्र्यांसोबत बैठक
आमदार मोहिते यांच्या आश्र्वासनानंतर तुर्तास प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे

महाबुलेटीन न्यूज : दत्ता घुले
शिंदे-वासुली, दि.२७ : आसखेड खुर्द हद्दीतील पुणे महानगरपालिकेच्या जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. सुमारे ९०० मीटर खोदकाम झाले असून पुढील दोन तीन दिवसात जलवाहिनेचे काम पूर्ण होईल. आणि पुढे शासन धरणग्रस्तांचे प्रश्न विचारात घेणार नाही. पुनर्वसन मागण्यांसंदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी सांगितले प्रमाणे २०० मीटर जलवाहिनेचे काम पण शिल्लक राहणार नाही. आज पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवडक पाच ते सहा शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही आणि काम बंद करण्याची सूचना दिली नाही. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी काम बंद करण्याची मागणी करीत जलवाहिनी काम काही वेळ बंद करून काम सुरू असणाऱ्या ठिकाणी ठिय्या मांडला.

उद्या जरी पालकमंत्र्यांसमवेत मिटिंग असली तरी आज काम बंद करावे आणि मगच शेतकऱ्यांसमवेत मिटिंग करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी काम बंद करण्याचे आदेश नाहीत, असे सांगितले. नंतर शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन ‘आम्ही काम बंद करु, आमच्या वर काय कारवाई करायची ती करा, आम्हाला अटक करा’ अशी भूमिका घेतली. शेवटी माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे म्हणणे कानावर घातले. तेव्हा आमदार दिलीप मोहिते यांनी फोन करून आता आंदोलन करुन, काम बंद करु नका. उद्याची पालकमंत्र्यांसोबतच्या मिटींगमध्ये समाधानकारक तोडगा काढू. आमदारांनी असे फोनवरून आश्र्वासन दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी आमदारांवर विश्र्वास दाखवत आजचे आंदोलन मागे घेतले.

उद्या पुण्याला पालकमंत्री अजित पवार व काही प्रमुख प्रकल्पग्रस्तांची बैठक असून बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असून आर या पार चा लढा देऊ आणि जलवाहिनेचे काम कोणत्याही परिस्थितीत बंद करणार असल्याचा इशारा उपस्थित असलेल्या भामाआसखेड धरणग्रस्त आंदोलकांनी दिला. त्यामुळे उद्याच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत भामाआसखेडचा तिढा सुटला नाही तर आंदोलन पेटणार हे निश्चित. वाटप केलेल्या जमिनी शासनाने परत काढून घेतल्यामुळे शासनाची पर्यायी जमीन वाटप करण्याची मानसिकताच नाही असा आरोप करत शेतकरी अधिकच आक्रमक झाले होते. हा कळीचा मुद्दा होऊ शकतो.

यावेळी सत्यवान नवले, देवीदास बांदल, चांगदेव शिवेकर, रोहिदास गडदे, ज्योती कुदळे, गजानन कुडेकर, आण्णा देवाडे, स्वप्निल येवले, संतोष कावडे, गजानन कुडेकर, किसन नवले, गणेश जाधव, तुकाराम नवले, संदीप होले, शांताराम शिवेकर, नवनाथ शिवेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!