पाच महिन्यानंतर गौराईच्या निमित्ताने ग्राहकांची रेलचेल
पाच महिन्यानंतर गौराईच्या निमित्ताने ग्राहकांची रेलचेल
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : कोरोनाच्या सावटाखालील पाच महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर गौरी आगमना दिवशी इंदापूर शहरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्याने आज ( दि.२५ ऑगस्ट ) ग्राहकांची मोठी रेलचेल दिसत होती.
शहरातील एसटी बसस्थानकासमोरचा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा पट्टा व्यवसायाला बरकत देणारा भाग आहे. तेथे व्यवसाय थाटणारांचे सहसा नुकसान होत नाही. त्यामुळे फळ विक्रेते, वडापाव विक्रेते यांच्या बरोबरच शेव चिवडा, चुरमुरे आणि तत्सम खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे व्यवसाय या ठिकाणी वर्षानुवर्षे चालत रहातात, ही बाब मागील पाच महिन्यांपर्यंत इंदापूर शहरवासीय व ग्रामीण भागातील लोकांच्या अंगवळणी पडली होती.
कोरोना व लॉकडाऊनमुळे पाच महिन्यात या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आपले व्यवसाय थाटण्याची पुरेशी संधी मिळाली नव्हती. अपवाद म्हणून खाद्यपदार्थ विक्रीस ठेवणारांना, लोक फिरकत नसल्याने तोटाच सहन करावा लागत होता. मात्र त्यांना यंदाच्या गौराईंनी साथ दिली. आज उशीरापर्यंत लोकांची गर्दी कायम होती.
—–