Saturday, August 30, 2025
Latest:
ग्रंथालय

नियोजनाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते : प्रा. नितीन बानगुडे पाटील

तळेगाव दाभाडे : छत्रपतींनी अठरा पगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन संघर्षातून सुराज्य स्थापन केले. शिवरायांनी पन्नास वर्षांत एवढे किल्ले बांधले. मात्र, कोणत्याही किल्ल्याला स्वत:चे नाव दिले नाही. नियोजन काय असते याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेंतर्गत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक राष्ट्रोत्सव’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, उमाकांत कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, पं. सुरेश साखवळकर, माजी नगरसेवक गणेश काकडे, निखिल भगत, ज्येष्ठ कवी प्रभाकर ओव्हाळ, संग्राम जगताप, सुदर्शन खांडगे, प्रा. प्रमोद बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.

प्रा. बानगुडे पाटील म्हणाले, की छत्रपती शिवरायांना वडील छत्रपती शहाजीराजे यांनी वयाच्या १२ व्या वर्षी भगवा ध्वज दिला. महाराजांनी पहिली सहकारी संस्था उभारली, तिचे नाव स्वराज्य होते. स्वराज्य उभारताना महाराजांनी राष्ट्र ही संकल्पना प्रथम मानली. महाराजांनी तयार केलेले मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था, गुप्तहेर यंत्रणा, व्यवस्थापन हे आजही मार्गदर्शक आहेत. आज जो महाराष्ट्र कृषिप्रधान दिसत आहे, त्याचे सर्व श्रेय शिवरायांना जाते. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ संकल्पनाही त्यांचीच आहे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांना मिळालेले मावळे हे स्वराज्यासाठी ध्येयवेडे होते. महाराष्ट्राला खरा धोका समुद्री सीमेकडून संभवतो, हे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी आरमार उभारले. त्यामुळेच आज जगातल्या अनेक देशांनी शिवरायांची रणनीती स्वीकारल्याचे दिसते.

पुढे बोलताना प्रा. बानगुडे पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोठी ग्रंथनिर्मिती झाली. लेखक, कवींना मान, प्रतिष्ठा मिळवून दिली. नंतरच्या काळात मात्र ही ग्रंथनिर्मिती मंदावल्याचे दिसते. एकंदरीत साहित्यमन घडविण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. ग्रंथामुळेच माणसं घडायला सुरुवात झाली. महाराष्ट्रधर्माची शपथ त्यांनी रयतेला दिली. मावळ्यांची शिवरायांवर प्रचंड निष्ठा होती. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांची काळजी घेतली जात होती. भेदभाव नव्हता, स्त्री सन्मान होता, राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी सर्वांनी घेतली होती, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या ओंकार विजय डोके (कनिष्ठ अभियंता पी.डब्लु.डी), सचिन लोखंडे (वरिष्ठ सहाय्यक लेखापाल जिल्हा परिषद कोल्हापूर) व प्रणव भेगडे (सी.डी.एस) यांचा प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद निकम यांनी, तर आभार राजेश बारणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!