Saturday, April 19, 2025
Latest:
निवडणूकमहाराष्ट्रराष्ट्रीय

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
पुणे, दि. ४ :
भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

देशात एकूण ७ टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार आहेत. त्यासोबतच चार राज्यांच्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणूका आणि १२ राज्यातील २५ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. याअनुषंगाने १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

भारत निवडणूक आयोगाने २८ मार्च २०२४ रोजी अधिसूचना जारी करुन राज्यात १९ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून १ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल आयोजित करणे, त्यांचे कोणत्याही माध्यमातून प्रसारण करणे, एक्झिट पोलचे निकाल जाहीर करणे यावर प्रतिबंध राहील असे स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमावर ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!