जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी महादेव सोमवंशी ( नाना ) यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी, फळे बागायतदार महादेव भिमाजी सोमवंशी नाना ( वय ८१ वर्षे ) यांचे रविवारी ( दि. २२ नोव्हेंबर ) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, तीन मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
उद्योजक संभाजी सोमवंशी यांचे ते वडील, उद्योजक शंकरराव, निवृत्ती, शिवाजी, माणिक, बाळासाहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुका उपाध्यक्ष अरुण सोमवंशी यांचे ते चुलते होत. माजी सरपंच योजनाताई सोमवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य साधनाताई सोमवंशी व सुशीलाताई सोमवंशी यांचे ते सासरे, भाजपचे शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख संदीप सोमवंशी, डॉ. सागर सोमवंशी व उद्योजक धनंजय सोमवंशी यांचे ते आजोबा, तर भाजपच्या महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा व पुणे बाजार समितीच्या माजी संचालिका क्रांतीताई सोमवंशी यांचे आजोबासासरे होत.
तीन भावांच्या एकत्र कुटुंबात नानांनी शेतीची धुरा सांभाळून कष्टाची जोड देऊन शेतात ऊस पिकासह, पपई, मोसंबी, द्राक्षे सारख्या फळांचे उत्पादन घेतले. १९७० च्या दशकात सोमवंशी परिवाराने गुळ उत्पादन करण्यासाठी गुऱ्हाळ सुरू केले तसेच त्याकाळी नानांनी खेड तालुक्यात एक नंबरचे बटाटा उत्पादन केले असता पुण्यातील शेतकी अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतात भेट देऊन बटाट्याची पाहणी केली.