नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी दिला आपल्या पदाचा राजीनामा
नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निर्णय घेऊन राजकारण्यांसमोर ठेवला आदर्श…
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष उजेर शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
शहरातील बहुसंख्य युवावर्ग, युवक काँग्रेसमध्ये काम करण्यास उत्सुक आहेत. शहरात पक्ष वाढत असेल तर आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी नवीन कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा. त्यांना संधी द्यावी, या विचाराने आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत. पुढील काळात पक्षवाढीसाठी आपण प्रयत्नशील रहाणार आहोत. तरी आपला राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर यांच्याकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात शेख यांनी म्हटले आहे.
मध्यंतरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप इंदापूरमध्ये आले होते. कार्यकर्ता मेळावा झाला होता. पदाधिकारी निवडण्यात आले होते. पक्षाला गती देण्याच्या दृष्टीने जगताप यांनी कानमंत्र दिला होता. तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणूका काँग्रेस पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर नव्या कार्यकर्त्यांसाठी पदाला तिलांजली देण्याचा निर्णय उजेर शेख यांनी अचानक घेतला आहे. गेल्या दोन तीन वर्षात तालुक्यात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर जे काही मोजके कार्यकर्ते काँग्रेस पक्षाबरोबर राहिले. त्यामध्ये शेख यांचा समावेश आहे. बोलका स्वभाव, सतत कार्य करत रहाण्याची वृत्ती यामुळे चांगला जनसंपर्क असणा-या उजेर शेख यांनी राजीनामा का दिला. पक्षात सारे आलबेल आहे का हे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
——-