Friday, April 18, 2025
Latest:
अध्यात्मिकखेडपुणे जिल्हाविशेषसण-उत्सव

नवरात्री विशेष : दावडी येथील महालक्ष्मीचे २९० वर्षांपासूनचे जागृत अस्तित्व, सयाजीराव गायकवाड यांनी उभारले मंदिर

नवरात्री विशेष :
दावडी येथील महालक्ष्मीचे २९० वर्षांपासूनचे जागृत अस्तित्व,
सयाजीराव गायकवाड यांनी उभारले मंदिर

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : राजगुरुनगर (ता. खेड) शहरापासून पूर्वेस १२ किलोमीटर अंतरावर दावडी हे गाव वसलेले आहे. येथे गावाचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मातेचे जवळपास २९० वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर आहे. या नवसाला पावणार्‍या महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रात विविध ठिकाणहून भाविक आवर्जून दावडी येथे येतात.

सन १७२९ ते ३९ या कालखंडात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पूर्वजांनी सरकारी कचेरीतून या ठिकाणी भव्य वाड्याची उभारणी केली. या वाड्याची भव्यता टिकवण्यासाठी येथे असलेली भावडी व शिवडी ही गावे उठवून याठिकाणी दावडी हे गाव वसविले.याच काळामध्ये राजवाडा, तटबंदी, पाणी पुरविठ्यासाठी दगडी थडगे करण्यात आले. या दगडी थडग्यामध्ये महालक्ष्मी माता असल्याचा दृष्टांत गायकवाड घराण्याला  झाला. गायकवाड घराण्याने दगडी थडग्याच्या बाजूला दगडी चिरेबंदी महालक्ष्मी मातेचे मंदिर उभारले. त्या काळामध्ये मातेचे दर्शन घेण्यासाठी तळघरात प्रवेश करून देवीचे दर्शन घेतले जात होते.

काही कालावधीनंतर राजकीय सारीपाठामुळे गायकवाड घराण्याने आपली स्वारी बडोद्याला हलवली. यानंतर सुमारे ५० ते ६० वर्षानंतर या वाड्याची व महालक्ष्मी मंदिराची सर्व सूत्रे सरदार कृष्णराव शितोळे यांच्याकडे सोपवण्यात आली. आता महालक्ष्मी मंदिराची देखभाल दावडीचे ग्रामस्थ करीत आहेत.  महालक्ष्मी मंदिराचा गावकऱ्यांनी गेल्या २० ते २५ वर्षापासून जीर्णोद्धार करून पूर्वीचे दगडी चिरेबंदी असलेले मंदिर पाडून दगडामध्ये नव्याने प्रशस्त मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिरात श्री गणेश, श्री शंकर, श्री दत्तात्रय या देवतांच्याही मुर्त्या बसविण्यात आल्या असून मंदिराबाहेर खूप मोठा परिसर सुशोभित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!