मुळशी क्षेत्रातील औद्योगिक वसाहती संदर्भात सुरक्षा कृती आराखडा तयार करण्याबाबत लवकरच बैठक घेणार : डॉ. नीलम गोऱ्हे
मुळशी क्षेत्रातील औद्योगिक वसाहती संदर्भात सुरक्षा कृती आराखडा तयार करण्याबाबत लवकरच बैठक घेणार : डॉ. नीलम गोऱ्हे
सॅनिटायझर कारखान्याला मौजे उरावडे ता. मुळशी जि. पुणे येथे लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते प्रत्येकी ५ लाख अनुदान वाटप…
महाबुलेटीन न्युज : विशेष प्रतिनिधी
पुणे, दि. १० जुलै : सॅनिटायझर कारखाना मौजे उरावडे, ता. मुळशी, जि. पुणे येथे दि ०७ जून, २०२१ रोजी लागलेल्या आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाला होता. या मृत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लक्ष आणि जखमी कामगारांना १२,७००/- रुपये अनुदान वाटप विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सेनापती बापट सभागृह, पंचायत समिती,मुळशी येथे करण्यात आले. यावेळी डॉ नीलम गोऱ्हे यांनी सर्व मृतात्म्यास श्रद्धांजली व्यक्त केली.
झालेली घटना ही क्षणात घडल्यामुळे कोणतीच उपाय योजना शक्य नव्हती. तसेच या तालुक्यातील उद्योगांना आगी पासून सुरक्षेबाबत असणारी यंत्रणा नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी भावना व्यक्त केली. या घटनेमुळे संपूर्ण कारखाना जळून गेल्याने सर्वांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. वरील प्रश्नासंदर्भात विधिमंडळ येथे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कारखान्याच्या सुरक्षाबाबत कृती आराखडा तयार करण्याबाबत सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येईल, असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
तसेच शासनाने कामगारांच्या वारसांना जी मदत केली आहे, ती योग्य ठिकाणी वापरावी व या परीवारांना सहकार्य मिळावे यासाठी जिल्हा परिषदने ”सपोर्ट ग्रुप” तयार करून त्यांना मदत करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. या अपघातातील कामगारांच्या मुले व मुलींना शिक्षणासाठी आवश्यक मदत जिल्हा परिषद, पुणे यांचे मार्फत केली जाईल, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वाटप करण्यात आलेल्या शासकीय ५ लाखाबरोबर कंपनीने प्रत्येक कुटुंबाला १० लाख देणेचे ठरविले आहे. त्यापैकी ५ लाख कंपनीने सर्व वारसांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. उर्वरित रक्कम डिसेंबर मध्ये दिली जाईल, असे सांगितले. तसेच तालुक्यातील विविध प्रश्न मांडताना फायर स्टेशन, लोड शेडिंग, कारखान्यांचे सेक्युरिटी ऑडिट, रस्त्यांची दुर्दशा व वारसांना इतर कंपन्यांच्या मध्ये नोकऱ्या याबाबत प्रश्न मांडले व हे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेण्याबद्दल विनंती केली. सदर बैठक ऑगस्ट महिन्यात घेण्यात येईल, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्ताविक तहसीलदार अभय चव्हाण यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जि.प. सदस्य शंकर मांडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदरे, महिला आघाडी स्वाती ढमाले, तालुकाप्रमुख सचिन खैरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम म्हात्रे, राष्ट्रवादी महादेव कोंडरे, शिवसेना महिला जिल्हा संघटिका संगीता पवळे, युवा अधिकारी अविनाश बलकवडे, पौड पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहळ, युवा तालुका अध्यक्ष संतोष तोंडे इत्यादी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास उपस्थित असणारे सर्वांनी शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या कोव्हिड-१९ च्या सर्व नियमांचे पालन केले.
००००