Thursday, April 17, 2025
Latest:
प्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रमुंबईविशेष

मुख्यमंत्र्यांची अखेर मोठी घोषणा, संपूर्ण राज्यात 28 मार्चपासून नाईट कर्फ्यू…

 

रात्रीची जमावबंदी लावण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या सूचना 

महाबुलेटीन न्यूज : किशोर कराळे
मुंबई, 26 मार्च : राज्यात कोरोना रुग्णांची (Coronavirus) वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याचं सांगत संपूर्ण राज्यात रविवारपासून ( दिनांक 28 मार्च 2021 ) रात्रीची जमावबंदी (Night Curfew in Maharashtra) लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने ही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक,जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ दीपक सावंत,मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड,मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता,महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!