“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेअंतर्गत आखरवाडी ग्रामस्थांची कोरोना तपासणी
कोविड १९ चे सुरक्षा कीटचे वाटप
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : आखरवाडी (ता. खेड) येथे (दि. १० ऑक्टोबर २०२०) रोजी कोविड १९ चे सुरक्षा कीट वाटप व “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, शहराध्यक्ष सुभाष होले, राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक, कांचन ढमाले, अॅड. मनिषा पवळे, सुजाता पचपिंड, युवती अध्यक्षा तांबे, सरपंच बबन मुळूक, उपसरपंच संगीता मुळूक, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ मुळूक, अनिल मुळूक, चेतन मुळूक, बबन मुळूक, स्वप्निल मुळूक, पोलीस पाटील नवनाथ मुळूक, अतुल मुळूक, मनोज मुळूक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसेविका दौंडकर, वैशाली मुळूक, रोहिदास मांजरे, आरोग्य कर्मचारीं, आशा स्वंयसेविका यांच्यासह आरोग्य पथकाने घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली. यावेळी कोरोना विषयक माहिती व कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी पाळावयाचे नियम तसेच घ्यावयाची काळजी याबाबत पथकाव्दारे माहिती सांगून जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर योग्य तो वैद्यकीय सल्ला व उपचारासंबंधी माहितीही यावेळी देण्यात आली.
तसेच ग्रामस्थांकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी अॅड. अरुण मुळूक यांच्या कडून आखरवाडीतील नागरिकांना घरोघरी जाऊन कोविड १९ चे सुरक्षा कीट (मास्क व सॅनिटायझर) चे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे आखरवाडी ग्रामस्थांनी कौतुक केले.