मंथन निरामय योगप्रसार केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
महाळुंगे इंगळे : सध्याच्या कोरोना काळामधील सर्व नियम व सुरक्षिततेच्या उपायांच्या अंगीकारासह मंथन फाउंडेशनच्या निरामय योगप्रसार केंद्राचा उद्घाटन सोहळा उद्योगनगरी महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथे पार पडला.
परभणीतील निरामय योग प्रसार व संशोधन संस्थेच्या सहकार्याने पुणे व चाकण येथे कार्यरत मंथन फाउंडेशनमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक ह्यांची मान्यता असलेल्या योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ह्या केंद्राच्या उद्घाटनाचा हा सोहळा महाळुंगे गावामध्ये राजमाता जिजाऊ अस्मिता भवन येथे पार पडला.
जिज्ञासा, साधना, प्रबोधन ह्या त्रिसूत्रीसह हे योग- मंथन कार्य आता सुरू होणार आहे. कोरोना काळाची अपरिहार्यता लक्षात घेऊन पुढील काही महिने हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रभरातील ३५ विद्यार्थ्यांनी ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे आणि योग शिक्षक बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले आहे.

महाळुंगे ग्रामपंचायतच्या माजी सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कृतिका वाळके ह्या सोहळ्याच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुणे म्हणून खराबवाडी येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रकाश खराबी हे होते. दोन्ही मान्यवरांनी मंथन-निरामयच्या ह्या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोरोना काळातील निर्बंधामुळे फेसबूक लाईव्ह पद्धतीने घेतलेल्या ह्या सोहळ्यामध्ये १०० पेक्षा जास्त जण ऑनलाईन उपस्थित होते. त्यामध्ये परभणीतील निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचे योग साधक व योग विद्यार्थी, मंथनच्या केंद्रामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी व इतर योग साधकांचा समावेश होता. ह्या पदविका अभ्यासक्रमाच्या संचालनासाठी मंथन फाउंडेशनसोबत सहकार्य करणा-या निरामय संस्थेचे ज्येष्ठ योग साधकही ह्या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन आणि रविना कुलकर्णी ह्यांच्या ओम कार व प्रार्थनेसह सुरू झालेल्या ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा महाळुंगकर ह्यांनी केले. आणि सर्व उपस्थितांना योगाच्या सूत्राने जोडले.
ज्येष्ठ योग साधक आणि प्राचार्य राम काकडे ह्यांनी ह्या पदविका अभ्यासक्रमामागची भुमिका विशद केली आणि त्यांचे योग साधक म्हणून असलेले अनुभव सांगितले. तसेच परभणीच्या निरामय संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली आणि आजच्या काळामध्ये योग किती महत्त्वाचा आहे, हे विशद केले.
मंथन फाउंडेशनचे सल्लागार दीपक निकम ह्यांनी मंथन फाउंडेशनच्या आजवरच्या वाटचालीबद्दल माहिती दिली आणि आरोग्य क्षेत्रामध्ये मंथन फाउंडेशन कशा प्रकारे काम करत आहे तसेच राज्यपालांच्या कौतुकाची थाप मंथन फाउंडेशनला कशी मिळाली आहे, ह्याबद्दल माहिती दिली.
ह्या अभ्यासक्रमामधील मुख्य शिक्षिका व मार्गदर्शिका असलेल्या विद्याताई आहेरकरांनी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना ह्या योग अभ्यासक्रमाची माहिती दिली आणि त्यातील घटकांची रूपरेषा सांगितली. ऑनलाईन पद्धतीने योग कसा शिकवला जाईल व कोणते विषय असतील ह्यासंदर्भात विद्यार्थ्यांना असलेल्या शंकांचेही त्यांनी निरसन केले. ह्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनी, केंद्र व्यवस्थापिका आणि मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशाताई भट्ट ह्यांनी ह्या अभ्याक्रमाच्या आयोजनाच्या तांत्रिक बाजूंवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाची सांगता रविना कुलकर्णी ह्यांच्या शांतीपाठाने झाली. चाकण परिसरामधील ह्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी भारती खोले, प्रिया महाळुंगकर, ललिता महाळुंगकर, पंकज महाळुंगकर, स्वरूप कुलकर्णी व शिवाजी बोत्रे ह्यावेळी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत महाळुंगेचे सहकार्य मिळाले.
वेळेमध्ये सुरू होऊन ठरलेल्या वेळी संपलेल्या ह्या कार्यक्रमाने आगामी अभ्यासक्रमाची वाटचाल कशी शिस्तबद्ध असणार आहे, ह्याचे एक प्रात्यक्षिक सादर केले. कोरोना काळातही आपण आपल्या आरोग्यासाठी कशा प्रकारे सजग होऊ शकतो आणि ‘निरामय जीवनाकडे’ वाटचाल करू शकतो, ह्याची एक नवीन दिशा ह्या ‘विचारमंथनातून’ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा सर्वच उपस्थितांना मिळाली.
ह्या अभ्यासक्रमासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक व्यक्तींनीआशा भट्ट मोबाईल क्र. 7350016571 ह्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फ़े करण्यात आले आहे.