माजी आमदार योगेश टिळेकरांसह 4 नगरसेवकांना अटक, 41 जणांवर गुन्हा दाखल, शासकीय कामात अडथळा
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या पाणी पुरवठा खात्यातील कार्यकारी अभियंत्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपच्या नगरसेविका राणी भोसले, नगरसेविका रंजना टिळेकर, नगरसेविका मनिषा कदम, वृषाली कामठे यांच्यासह 41 जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे. काम रोखणे, अधिकारी- कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, अशा राजकीय नेत्यांच्या भूमिकेविरोधात महापालिकेने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यातून टिळेकरांवर ही कारवाई करण्यात आली.
पाणी पुरवठा सुरळीत होणे हे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची प्राथमिक मागणी असते. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांना सातत्याने वेठीस धरलं जातं. नगरसेवकही महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांवर वेळप्रसंगी दादागिरी करून पाणी पुरवठा सुरुळीत होईल, याकडे लक्ष देतात. पुण्यात असे अनेक प्रसंग यापूर्वीही घडले आहेत. पण, माजी आमदार, नगरसेवकांसह 41 जणांना अटक होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.
■ काय घडले नेमके का झाली कारवाई?
———————-
कात्रज-कोंढवा रस्ता बालाजीनगर, धनकवडी परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टिळेकर यांनी हे आंदोलन केले होते. महापालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरण केंद्रा अंतर्गत आठवड्यातून एक दिवस काही भागातील पाणी पुरवठा बंद केला जातो. या जल केंद्रातून गेली २ वर्षे ही पाणी कपात करण्यात येत आहे. ही पाणी कपात बंद करून १ ऑक्टोबर पासून सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले होते. तरीही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने टिळेकर आणि त्या भागातील नगरसेवकांनी स्वारगेट येथील कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांना जाब विचारला. तेव्हा जाधव आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वाद झाला. तसेच ऑफिसची तोडफोड करण्यात आली. याबाबत महापालिकेने स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.