महिंद्रा कंपनीतील कामगार संघटनेचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कोरोना काळात सहकार्याबद्दल व्यवस्थापनाचे कामगारांकडून कौतुक
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या प्रशासनाच्या उपक्रमाला व्यवस्थापनाचा उत्तम प्रतिसाद
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण : औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा वेहिकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड या प्रतिष्ठित वाहन उद्योगातील कंपनीच्या 2345 कायमस्वरूपी कामगारांच्या असोसिएट युनियन या कामगार संघटनेचा आठवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी कंपनी व्यवस्थापनातर्फे प्लांट हेड श्री नासिर देशमुख, एम्प्लॉईज रिलेशन विभागाचे महाव्यवस्थापक श्री महेश करंदीकर, उपमहाव्यवस्थापक श्री ज्ञानेश पोतदार, उत्पादन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री प्रवीण पत्रावळी उपस्थित होते.
याप्रसंगी कामगार संघटनेचे विद्यमान पदाधिकारी व माजी पदाधिकारी तसेच कामगार उपस्थित होते. याप्रसंगी कामगार संघटनेतर्फे बोलताना संघटनेचे अध्यक्ष श्री सागर भोसले व संघटनेचे सचिव श्री सुशांत मोहिते यांनी सर्व कामगारांचे अभिनंदन केले व संघटनेला करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. व्यवस्थापनातर्फे होत असलेल्या सहकार्यासाठी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनास धन्यवाद दिले.
कंपनीतर्फे व्यवस्थापनाने सर्व कामगारांना शुभेच्छा देत पुढील काळात असेच चांगले सहकार्य मिळत राहो, ही अपेक्षा व्यक्त केली. कोरोना सारख्या महामारीच्या काळात कोरोना बाधित कामगारांचे कुठल्याही प्रकारे वेतन कपात न केल्यामुळे व ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत प्रशासनाने राबविलेल्या उपक्रमासाठी सहकार्य करीत कर्मचारी वर्गाला पगारी सुट्टी देण्यात आली.
तसेच कुटुंबातील सदस्य कोरोना बाधित असल्याकारणाने कामगारांची कुठल्याही प्रकारची वेतन कपात न करता भर पगारी सुट्टी दिल्याबद्दल व कोरोना टेस्टचे देखील पैसे देऊन जे विशेष सहकार्य व्यवस्थापनाकडून करण्यात आले, त्याचे कौतुक करीत विशेष आभार मानण्यात आले. याप्रसंगी कामगारांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्वांचे आभार मानून आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.