महिला दिन विशेष : खेड तालुक्याची कन्या रणजी क्रिकेट संघात…
महाराष्ट्र महिला सिनियर रणजी क्रिकेट संघात ऋतुजा गिलबिले हिची निवड…
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण, दि. ८ मार्च : खेड तालुक्याची सुकन्या कु. ऋतुजा रवींद्र गिलबिले ( वय २० ) हिची नुकतीच राजस्थान ( जयपूर ) येथे होणाऱ्या सामन्यासाठी महाराष्ट्र महिला सिनियर ( रणजी ) क्रिकेट संघात निवड झाली आहे.
ऋतुजा गिलबिले हिचे मूळ गाव कोयाळी तर्फे वाडा असून चासकमान धरण झाल्याने वडील रवींद्र गिलबिले हे शिक्रापूर येथे विस्थापित झाले आहेत. त्यांना स्वतः ला क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी ऋतुजास क्रिकेटसाठी प्रेरणा दिली. यातूनच ऋतुजा राष्ट्रीय व राज्य स्तरावर खेळत आहे, ही अभिमान वाटावा अशी बाब आहे.
ऋतुजाने आपल्या क्रिकेट खेळाची सुरुवात कडूस क्रिकेट अकॅडमी मधून केली. सध्या पुणे येथील एच. पी. अकादमीत ती सराव करत आहे. तिला कोच म्हणून ललित मुसळे, भूषण सर, पाटील सर, तिकोने सर, सँडी सर, सुभान शेख, रिक्षा चालक पिंटू काका आदींचे मार्गदर्शन लाभत आहे. सोबतच पर्सनल कोच म्हणून हेमंत किणीकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
या यशात तिला संतोष बारणे (एम. डी. सिल्वर ग्रुप), हेमंत पाटील, ऍड.संदीप शिंदे यांचे सहकार्य मिळाले आहे. ऋतुजाने घेतलेले कष्ट, चिकाटी यातूनच ती आज राष्ट्रीय व राज्य स्तरावर खेळत आहे, ही फार कौतुकाची बाब आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ही प्रेरणादायी बाब आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
—–