महावितरण कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या खळखट्याक आंदोलनातील तिघांना जामीन मंजूर …..
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : महावितरण कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या खळखट्याक आंदोलनातील तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, महावितरण अव्वाच्या सव्वा विज बिल आकारणी करत असल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महावितरण कार्यालयात लेखी निवेदन दिले होते. परंतु महावितरण कार्यालयाने याबाबत ठोस उपाययोजना व कार्यवाही न केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन याबाबत जाब विचारला होता. परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तसेच महावितरण कार्यालयाबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा व वीज बिल ग्राहकांची कोविडच्या धर्तीवर होणारी पिळवणूक यासाठी मनसे आंदोलनाच्या पवित्र्यात उतरली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या खळखट्याक आंदोलनामुळे मनसेचे सोपान शंकर डुंबरे, मंगेश गुलाब सावंत, नितीन गोविंद ताठे अशा तीन पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी भादवि कलम 353 सरकारी मालमत्तेचे नुकसान कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली होती. या तिघांनाही राजगुरुनगर येथील तालुका न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर केलेली होती. या सर्वांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. काल दिनांक 21/ 9 /2020 रोजी न्यायालयाने घेतलेल्या सुनावणीत हा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.
आरोपितर्फे अँड. निलेश आंधळे व अँड. गणेश म्हस्के यांनी न्यायालयात बाजू मांडली.