महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; ऐन दिवाळीत उडणार धुरळा, सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार
Gram Panchayat Election : महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; ऐन दिवाळीत उडणार धुरळा, सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार
महाबुलेटीन न्यूज
मुंबई : जानेवारी ते डिसेंबर 2023 या दरम्यान मुदत संपणाऱ्या नवनिर्मित तसेच 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता ऐन दिवाळीत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज 2359 ग्रामपंचायतींची, तर 3080 ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यपदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 17 जानेवारी 2023 आदेशान्वये राज्यातील जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीतमुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित व 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम देण्यात आला आहे.
या ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचना 25 एप्रिलला राज्य निवडणूक आयोगाने आलेल्या हरकती विचारात घेऊन अंतिम केली. या कार्यक्रमानुसार राज्यातील सुमारे 2289 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाल्याचे शासनाने 25 मे, 2023 च्या पत्रान्वये कळविले. 14 जुलैला या ग्रामपंचायतींची मतदार यादी अंतिम झाली होती. आता आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
# निवडणूक कार्यक्रम असणार पुढीलप्रमाणे : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 6 ऑक्टोबरला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, 16 ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 या वेळेत अर्ज दाखल करणे, 23 ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी तर 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे. आवश्यकता भासल्यास निवडणूक 5 नोव्हेंबरला घेण्यात येणार असून, 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे राजकीय धुराळा उडणार आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या निवडणुकीत रंगत वाढणार आहे. #Political News #Mahabulletin News
0000