महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जुन्नर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर
विद्यमान अध्यक्ष रवींद्र भोर यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी तर राजेश डोके यांची जुन्नर तालुका अध्यक्ष पदी वर्णी
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
घोडेगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक, संघटक संजयजी भोकरे, राज्याध्यक्ष वसंत मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरचिटणीस मा. विश्वासराव आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जुन्नर तालुका अध्यक्ष रवींद्र भोर यांच्या अध्यक्षतेखाली नारायणगाव येथील विश्रामगृहात जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील कार्यकारिणीची सभा संपन्न झाली. यामध्ये जुन्नर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र भोर यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी तर जिल्हा संपर्क प्रमुख पदी अशोक डेरे निवड करण्यात आली.
यावेळी जुन्नर तालुक्याची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली असून त्यामध्ये अध्यक्ष पदी राजेश डोके, उपाध्यक्ष मंगेश रत्नाकर, भरत अस्वार, सचिव पदी गोपीनाथ शिंदे, कार्याध्यक्ष विठ्ठल शितोळे, खजिनदार विकास गडगे, संपर्क प्रमुख रवी गजे, सह संपर्क प्रमुख व प्रसिद्धी प्रमुख विजय चाळक, तालुका मार्गदर्शक पदी शिवाजी अस्वार यांची निवड करण्यात आली.
राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, पत्रकार संघात काम करत असताना सर्वांनी आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात काम करणे अपेक्षित आहे. पत्रकाराच्या हिताचे निर्णय संघाकडून घेतले गेलेले आहेत यापुढेही घेतले जातील. एक चांगला पत्रकार म्हणून आपले व आपल्या संघाचे नाव उज्ज्वल कसे होईल यासाठी सर्वांनी एकदिलाने चांगले काम करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी २६/११ रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच कोरोना कालावधीत मृत्यू पावलेल्या पत्रकार बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते फेटा, शाल, मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आंबेगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय भानुदास साळवे यांचा व सकाळ समूहाने उपक्रमशील शिक्षक म्हणून सन्मान झालेले शिक्षक अविनाश खंडू घोलप यांचा यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने शाल, फेटा व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, आंबेगाव तालुका अध्यक्ष समीर पठाण, जुन्नर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया उपाध्यक्ष कैलास बोडके, दादा रोकडे, विठ्ठल प्रभाकर फुलसुंदर महाराज, चंदर शिंदे, ज्ञानेश्वर खिरड आदी उपस्थित होते.