महाळुंगे इंगळे गावातील १८ वर्षीय युवकाचे अपहरण, पुन्हा जुने आरोपी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या रडारवर..!
महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे : सध्या चाकण औद्योगिक वसाहतीत अल्पवयीन व जुने रेकॉर्डवरील आरोपी सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यातच महाळुंगे इंगळे गावातील एका १८ वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आणि त्यात काही जुन्या आरोपींचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, १६ मार्च २०२४ रोजी महाळुंगे इंगळे गावातील भांगरे वस्ती येथील आदित्य युवराज भांगरे (वय-१८ वर्षे) यास काही अनोळखी व्यक्तींनी घराजवळून अपहरण केल्याची फिर्याद आदित्य यांच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंदवली. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
याच प्रकरणात एका संशयित आरोपीस चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतले आहे. पण अजूनही अपहरण केलेला आदित्य याचा शोध लागला नाही. त्यामुळे आदित्य बरोबर काही विपरीत तर घडले नसेल ना? की आदित्य जिथे असेल तिथे सुखरूप आहे, याची कोणतीही माहिती अजून प्राप्त झाली नाही. त्यातच आदित्य भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत अपहरण केलेले अनोळखी व्यक्ती या मागील काही दिवसापूर्वी महाळुंगे गावात निर्घृणपणे खून झालेल्या रितेश पवार याचे साथीदार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. त्यामुळे पुन्हा महाळुंगे इंगळे गावातील जुने आरोपी पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे विशेष तपास पथक महाळुंगे इंगळे गावातील सर्व रेकॉर्डवरील व जुने आरोपी यांची कसून चौकशी करत आहेत. आता पोलिसांच्या पुढील तपासातूनच नक्की आदित्य सुखरूप आहे की,त्याचा काही घातपात झाला हे निष्पन्न होईल.
या गंभीर घटनेचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) संतोष कसबे हे करत आहेत.