महाबुलेटीन दिनविशेष : १ ऑक्टोबर – ज्येष्ठ नागरिक दिन
********************************
१ ऑक्टोबर – ज्येष्ठ नागरिक दिन
********************************
सर्व ज्येष्ठ-वरिष्ठ नागरिकांना, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणच व्हावे ज्येष्ठांची काठी !
जाणीव वेदनेच्या संवेदनेची !
■ आपलं आयुष्य कसं सारीपाटासारखं असते नाही?
या जीवनात केव्हा काय होईल ते कुणालाच सांगता येत नाही. आता हेच बघा ना,
एक गरीब पण प्रामाणिकपणे कष्ट करुन जगणारे जोडपे. पदरी दोन मूले.
हालाअपेष्टा सहन करीत कष्टाने मुलांना शिक्षण दिलेले. यथावकाश दोन्हीही मुलांना चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली.
आता सांपत्तिक स्थिती पूर्णपणे पालटलेली. दोन्हीही मुलांची लग्ने झालेली.
दोन मुलांचे दोन फ्लॅटस्. दोन गाड्या. भरपूर दागदागिने. अब तो चारों उँगलियाँ घी में.
अक्षरशः स्वर्गसुख ज्याला म्हणतात, ते या जोडप्याच्या पायाशी लोळण घेत असलेले. अचानक दुर्दैवाची माशी शिंकते.
त्या कष्टाळू, प्रामाणिक व प्रेमळ जोडप्याची रवानगी वृध्दाश्रमात होते. एका क्षणात त्यांच्या जीवनात दुःखाचा अंधार पसरतो.
■ आता दुसरा प्रसंग पाहु या…
युध्दात शहीद झालेल्या एका सैनिकाची पत्नी. पती शहीद झाल्यावर स्वतः अशिक्षित असतांनाही काबाडकष्ट कष्ट करुन मुलाला कलेक्टर बनविलेले.
पण त्या मूलाने आपल्या प्रेस्टिजसाठी आपल्या अशिक्षित वृध्द मातेला घराबाहेर काढलेले. आई त्याच्या कार्यालयात आली तर ओळख सुध्दा दर्शविणार नाही, असा हा निगरगट्ट मुलगा!
वृध्द आई मात्र त्याच्या घरासमोर ऊन, वारा व पाऊस कशाचीही तमा न करता; आपला मुलगा कधी ना कधीतरी आपल्याला घरात घेवून जाईल अशी वाट पहात बसलेली. अगदी डोळ्यांत पाणी आणून एकटक बघत असलेली.
तिच्या डोळ्यांतील अश्रू जणू बोलतात,
बेटा,
तू दिलेल्या वेदनांची
गाठ साहते मी,
केलेस मजला बेघर,
अश्रूंचे पाट वाहते मी,
पोरा तुझा प्रतिष्ठित,
साहेबी थाट पाहते मी,
पण घरात कधी घेशील मजला,
वाट पाहते मी!
किती ही दयनीय अवस्था!
■ आपल्याही जीवनात असे काहीच घडू नये म्हणून आपण एक जबाबदार पालक या नात्याने पुढील काळजी घेवू या!
* पाल्याशी मित्रत्वाचे संबंध असू द्यात.
* पाल्यांना धीर धरणे अर्थातच “संयम” शिकवा.
* आपल्या आचरणाद्वारे का होईना पण वडीलधा-या व्यक्तींचा आदर करीत त्यांना मदत करण्याचा सदगुण पाल्यांच्या मनी बिंबवा.
* आपल्या सांपत्तिक परिस्थितीची जाणीव कळत नकळत पाल्यांना होवू द्या.
*आपण आपली गरीबी पाल्यांपासून लपवून स्वतः हाल सोसत पाल्यांच्या मागण्या पूर्ण करतो. मागण्यांना अंत नसतो. परिस्थितीची जाणीव होणे हा एक महत्त्वाचा संस्कार पाल्यांवर आवश्यक.
* घरात सून आल्यास तिला पूर्ण सहकार्य केले तर ‘सासरवास’ हा शब्दच नाहीसा होतो. सूनेच्या मनात आपल्याबद्दल आपुलकीची भावना तयार होणे हिच खरी काळाची गरज आहे.
आता आम्ही नव्या पिढीला सांगतो की, जूनी पिढी ही अनुभवाने थोर आहे.
वृध्दांप्रती कृतज्ञतेचा विचार आपल्या मनी असायलाच हवा. त्यांनी आयुष्यभर केलेला त्याग आपण लक्षात घ्यायलाच हवा.
त्यांच्या प्रेमळ छायेची व त्यांच्याकडून होणाऱ्या संस्कारांची आपल्या लाडक्या अपत्यांना गरज आहे.
वृध्दजनांच्या आयुष्याची सांजवेळ जवळ आलेली असतांना, त्यांना वृध्दाश्रम नकोय तर आपला आधार हवाय.
त्यांच्या आयुष्याच्या सांजवेळी त्यांना सुखी व आनंदी ठेवणे हिच आपली त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता होय.
आज जूनी पिढी जात्यात, तर आपण सुपात आहोत.
आपणही एक ना एक दिवस, वृध्दापकाळाच्या जात्यात जाणारच आहोत, याची जाणीव क्षणोक्षणी असावी.
वरिष्ठांचा आशीर्वाद, मार्गदर्शन आणि संस्कार या बाबी नव्या पिढीसाठी अमृताचा ठेवा आहेत. पुण्यवान पिढीलाच हा अमृताचा ठेवा मिळतो. हा अमृताचा ठेवा आपल्याच घरी जतन करणे हिच खरी माणूसकी.
वृध्दांप्रती कृतज्ञतेचा मनी विचार हा हवा,
आयुष्याच्या सांजवेळी त्यांना सुखी ठेवा;
वृध्दांना वृध्दाश्रम नको त्यांना आधार हवा,
घरोघरी वृध्दजन हा खरा संस्कारांचा ठेवा!
आता नेहेमीप्रमाणे चारोळीने सांगता करुन आम्ही आपला निरोप घेतो!
आपणच व्हावे ज्येष्ठांची काठी
जे झालेत वृध्द आपल्यासाठी,
जीवन असावे त्यांच्या सेवेसाठी
नको वृध्दाश्रम वृध्दांच्या पाठी!