Sunday, April 20, 2025
Latest:
दिन विशेषपुणे जिल्हाविशेष

महाबुलेटीन दिनविशेष : २ ऑक्टोबर – आकाशवाणी पुणे केंद्राचा वाढदिवस

 

२ ऑक्टोबर – आकाशवाणी पुणे केंद्राचा वाढदिवस
********************************

स्थापना – २ ऑक्टोबर १९५३

आकाशवाणी पुणे केंद्राचा आज वाढदिवस. २ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली.

गेली ६५ वर्षे आकाशवाणी पुणे केंन्द्र श्रोत्यांसाठी “बहुजन हिताय बहुजन सुखाय” ह्या ब्रीद वाक्याचं पालन करत आले आहे. रेडिओवरच्या मध्यम लहरी ७९२ किलोहर्ट्झवर वर ऐकू येणारे आकाशवाणीचे पुणे केंद्र. या केंद्रात सुधा नरवणे, भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ, मंगेश वाघमारे, संजय भुजबळ अशा अनेकांची कारकीर्द बहरली.

आकाशवाणीवर सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती वरील सकाळी शास्त्रीय संगीत विषयाला वाहलेला हा आणि जुन्या हिंदी गाण्यांचा ‘भुले बिसरे गीत’ हा कित्येक वर्षे सुरु असलेला कार्यक्रम आजही अनेक श्रोते ऐकत असतात.

कुठल्याही विषयाचे बंधन नाही, अतिशय आशयपूर्ण, माहितीपूर्ण असे विविध कार्यक्रम पुणे आकाशवाणीवर ऐकू येत असतात. मराठी साहित्याशी निगडीत असलेले पुस्तक वाचनाचे कार्यक्रम असो, किंवा बऱ्याच वेळेला आकाशवाणीच्या खजिन्यातून निवडक कार्यक्रम पुन:प्रसारित करतात, त्यातही गेल्या पिढीतील कलाकार, व्यक्ती यांची ओळख होत राहते.

दुपारचे कार्यक्रम जास्त ऐकले जात नाहीत असे वाटते, पण गृहीणी त्याचा आस्वाद घेत असतात. संध्याकाळचे, विशेषत: रात्रीचे कार्यक्रम जसे नभोनाट्य, राष्ट्रीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, हे देखील दर्जेदार असतात. पुणे विविधभारतीवरील रात्रीचा छायागीत हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम देखील कित्येक वर्ष चालू आहे.

भारताची, तसेच महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारे कार्यक्रम जसे संकृत भाषेवरील गीर्वाण भारती, संगीत नाटकांच्या इतिहासावरील कार्यक्रम, असे वैविध्य असते. सामाजिक बांधिलकी जपणारे, आणि त्या निमित्त वेगवेगळया व्यक्ती, संस्था यांचा परिचय करून देणारे कार्यक्रम देखील अतिशय उद्भोधक असतात.

पुणे आकाशवाणीवर ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला १९६० च्या दशकात सादर केलेला गीतरामायण हा कार्यक्रम तर दंतकथा होवून बसला होता. पण आज काल प्रायोजित कार्यक्रमांचा देखील आकाशवाणीवर भडीमार असतो, त्यातही काही चांगले प्रायोजित कार्यक्रम आहेत. पालखीवर दरवर्षी “पायी वारी पंढरीची “ही कार्यक्रम मालिका प्रसारित करण्याची परंपरा आकाशवाणी पुणे केंद्रानं जपली आहे.

पुणे आकाशवाणीने ‘निवेदक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमा अंतर्गत पुणे आकाशवाणीचे निवेदक श्रोत्यांच्या भेटीस आणले होते. यात मंगेश वाघमारे, गौरी लागू, सिद्धार्थ बेंद्रे, प्रतिमा कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, डॉ.प्रतिमा जगताप, कैलास जगताप, संजय भुजबळ या निवेदकांनी आयोजित केलेल्या बहारदार रंजक कार्यक्रमाचा आस्वाद रसीकांनी घेतला.

सध्या विशेष गीतगंगा या खास कार्यक्रमात दर शनिवारी आणि रविवारी आपण विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या पसंतीची गाणी आणि त्या संदर्भातील त्यांच्या आठवणी ऐकत असतो. हा कार्यक्रम संजय भुजबळ सादर करत आहेत. नुकताच विशेष गीतगंगा कार्यक्रमाच्या १०० व्या विशेष भागात सुबोध भावे यांनी कार्यक्रम सादर केला होता. पुणे आकाशवाणीचा ब्लॉग देखील आहे.

आकाशवाणीचे पुणे केंद्र आता थेट तुमच्या मोबाइलवरही ऐकता येते. पूर्वी मोबाइलवर फक्त ‘एफएम वाहिनी’ ऐकण्याचीच सोय होती. आता मात्र, आकाशवाणी पुणेची मुख्य वाहिनीच मोबाइलवर ‘लाइव्ह’ ऐकण्याची सोय उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी हेडफोन लावण्याचीही गरज नाही. परिणामी, रेडिओ नसल्याने आकाशवाणी पुणे केंद्रापासून दुरावलेले रसिक श्रोते पुन्हा आकाशवाणी ऐकू शकतील. या वर आपण आकाशवाणी पुणे केंद्राचे विविध बातमीपत्रे, चिंतन, स्नेहबंध, युववाणी, माझे घर-माझे शेत, लोकसंगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, आपलं आरोग्य, विज्ञान जगत, नातं निसर्गाशी, विशेष गीतगंगा हे सर्व कार्यक्रम ऐकू शकाल.

गुगल प्ले-स्टोअरमधून NewsOnAir Prasar Bharati Official AppNews+Live हे अॅप डाउनलोड करा. अॅप इन्स्टॉल केल्यानंतर सर्वांत वर डाव्या बाजूला तीन रेषा दिसतील. त्यावर क्लिक करून त्यातून ‘लाइव्ह रेडिओ’ हा पर्याय निवडा. त्यानंतर समोर येणाऱ्या यादीतून ‘एआयआर पुणे’ यावर क्लिक करा. यावर आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रसारण व पुणे विविध भारती ऐकता येईल.

आकाशवाणी पुणे केंद्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

********************************.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!